Breaking News

विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर, दि. ११ : राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.विधिमंडळ परिसरातील या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, उपसंचालक(पुणे) मोहन राठोड,उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
विधिमंडळ परिसरात प्रवेश करताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेले लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात १९६४ पासूनचे अनेक विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. 

यामध्ये बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर १९९०), सानेगुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख,महात्मा गांधी, स्वातंत्र्य दिन, विदर्भ विशेषांक (२०११ व २०१७) अखिल भारतीय साहित्य संम्मेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह इतरही विषयाला परिपूर्ण वाहिलेले विशेषांकही उपलब्ध आहेत.