Breaking News

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही- जलसंपदा मंत्री

नागपूर, दि. 22, डिसेंबर - महाराष्ट्राचे संपूर्ण पाणी राज्यालाच मिळत आहे. गुजरातला पाण्याचा थेंबही जात नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले.या बाबत अतुल भातखळकर यांनी राज्यातील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याबाबत प्रश्‍न विचारला होता. 


त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले की, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी असून त्या माध्यमातून मुंबईला 20.44 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी चार योजना प्रस्तावित असून त्यासाठी 10 हजार 881 कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळावे, अशी मागणी राज्य शासनामार्फत करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच उपलब्ध होणार असून गुजरातला पाणी दिले जाणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.