Breaking News

व्यावसायिकाला मारहाण करून 4 लाख लांबवले

जळगाव, दि. 22, डिसेंबर - कापडी पिशवीत ठेवलेली चार लाखाची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवून चटई कंपनीत निघालेल्या व्यावसायिकास मागून आलेल्या दुचाकीवरील संशयिताने वाहन अडवित मारहाण केली आणि जबरीने डिक्कीतील रोकड हिसकवुन पोबारा केल्याची खळबळजनक घटना आरएल चौफुलीजवळ बनवट इंडस्ट्रीसमोर घडली. 


मंगलसिंग दिवानसिंग पाटील (53) हे कुटुंबासह पोलीस कॉलनी सुप्रीम कॉलनीत वास्तव्यास आहेत. एमआयडीसी परिसरात डब्ल्यू सेक्टर प्लॉट.नं. एडब्ल्यू 46 मध्ये असलेली तुषार पाटील यांची चटई कंपनी भाड्याने चालविण्यासाठी त्यांनी घेतली आहे. या कंपनीत तीस मजूर काम करतात. या कामगारांना दर महिन्याला 15 ते 20 तारखेच्या दरम्यान रोख पगार करत असतात. कामगारांना पगार करण्यासाठी रात्री 08.30 वाजता मंगलसिंग पाटील यांनी घरून चार लाखांची रोकड पिशवीत भरून ही बॅग क्रमांक एम.19 बी.झेड. 7700 या डिक्कीत ठेवून ते चटई कंपनीकडे निघाले होते. 

आरएल चौफुली येथून कंपनीकडे वळण घेतल्यानंतर त्यांची दुचाकी बनवट इंडस्ट्रीजजवळ वळणावरून जात असताना पाटील यांच्या मागून एका दुचाकीवरून एक संशयित येऊन त्याने त्यांच्या दुचाकीला अडवून थांबविले.यानंतर मारहाण करून चार लाखाची रोकड लांबविली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.