Breaking News

आभाळ फाडणारेच बोंबा मारताहेत : मुख्यमंत्री

नागपूर: ज्यांच्या कार्यकाळात आभाळाला छिद्र पाडण्यात आलीत, तेच लोक आता आभाळ फाटल्याच्या बोंबा मारताहेत असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी नांदुरा येथे सोडले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.


तसेच सुमारे 10 कोटी रुपयांच्या विकास कामांना हिरवा कंदिल दाखवठ्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार घेताना बोलत होते. स्थानिक कोठारी विद्यालयात आयोजीत कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने सर्व प्रलंबीत प्रकल्पांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून यासाठी निधी खेचून आणला. 108 प्रकल्पामुळे सिंचनाच्या सोयी शेतकर्‍यापयर्ंत पोहचू शकणार आहे. यासाठी प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली. 30 हजार कोटी रुपये यासाठी मंजूर झाले. जी कामे अर्धवट सोडली आहेत. ती कामे हातात घेवून पुर्णत्वात नेण्यासाठी येत्या 2 वर्षात प्रयत्न केले जातील. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही कटाक्षाने काळजी घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, खामगाव आदी तालुक्यातील रस्ते, पूलाचे काम सुरु झाले आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव आदी शहरातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन पिढ्या रस्त्यात खड्डे पडणार नाही असे 100 टक्के गुणवत्ता असलेले रस्ते आम्ही देवू असे आश्वासन गडकरी यांनी दिले. शेतकरी कर्जमाफीवर बोलताना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, राज्यातील 22 हजार कोटी रुपये शेतकर्‍याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. जिल्हयातील शेतकर्‍यांना प्राधान्य देत 665 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे कुणीही दिशाभूल करू नका असा इशारा फुंडकर यांनी यावेळी दिला