काकडी विमानतळ सुरक्षायंत्रणेची डोकेदुखी वाढली!
राहाता प्रतिनिधी - शिर्डी विमानतळ धावपट्टी परिसरात कोल्हासदृश्य प्राण्याच्या वास्तव्याने विमानतळ सुरक्षा यंत्रणा चिंतेत पडली आहे. अनेक पिंजरे लावूनही वनविभागाला कोल्हा काही केल्याने सापडत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. शिर्डी विमानतळ सुरू होताच त्याचे व्हीआयपीसाठी किती महत्त्व आहे, ते दोन महिन्यांतच लक्षात आले. काकडी विमानतळावर महामहिम राष्ट्रपती त्यानंतर उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री या विमानतळावर येऊन गेले. या विमानतळावर व्हीआयपी यांचा राबता यापुढेही असणार आहे. त्यादृष्टीने सुरक्षेची जबाबदारी विमानतळ सुरक्षा यंत्रणेची आहे.
विमानतळ परिसरात अनेक सुविधांचा अभाव आहे. यामुळे काही ना काही कारणांनी येथील यंत्रणेला डोकेदुखी वाढत आहे. विमानाचे ट्रायल घेण्याच्या पहिल्याच दिवशी ऐन विमान लँडींग होत असताना एक कुत्रे धावपट्टीवर आले. ते हाकलताना कर्मचार्यांच्या नाकी नऊ आले. त्यानंतर कुत्रे आत येणार नाही, याची काळजी घेतली जाऊ लागली. त्याला काही आठवडे उलटत नाही तोच एक तरुण थेट भिंतीवर चढून धावपट्टीवर आला. सुरक्षा यंत्रणा व कर्मचार्यांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो संगमनेर तालुक्यातील भोळसर तरुण निघाला.
विमान कसे असते ते पाहण्यासाठी तो आल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यावर त्याला त्याच्या घरी सोडून देण्याची वेळ पोलिसांवर आली. काही दिवसांपूर्वी कोल्हासदृश्य प्राणी धावपट्टी परिसरात काही कर्मचार्यांना दिसला. तेव्हापासून त्याचा शोध सुरू आहे. पण तो काही केल्या सापडत नाही. त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले. त्यात त्याचे आवडते खाद्यही ठेवून पाहिले. पण तो काही हाती लागला नाही. परिसरातील पाणी वाहून जाणार्या नळ्यांना झाकणे लावली. तरीही अधूनमधून हा प्राणी दिसतो. या प्राण्याला पकडण्यासाठी अनेक प्रयोग सुरू आहेत. मात्र तो अद्याप न सापडल्याने सुरक्षा यंत्रणा व विमानतळ कर्मचार्यांची डोकेदुखी वाढली आहे.