Breaking News

जीडीपीच्या दरासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव : सुब्रमण्यम स्वामींचा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका.

नवी दिल्ली : भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला टार्गेट केले आहे. स्वामींनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर शाब्दकि हल्लाबोल चढवला आहे. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर आणि जीडीपीवर प्रतिकूल प्रभाव पडला नसल्याचे दाखवण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय सांख्यकी विभागाच्या अधिका़र्‍यांवर सातत्याने चांगले आकडे देण्यासाठी दबाव आणते’, असा खळबळजनक आरोप यावेळी स्वामींनी केला आहे. स्वामी हे अहमदाबाद येथील चार्टर्ड अकाऊंटंटच्या एका परिषदेला मार्गदर्शन करत होते. त्यावेळी त्यांनी स्वपक्षालाच लक्ष्य केले. 



चांगली आकडेवारी देण्यासाठी केंद्र सरकार सांख्यिकी विभागावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, कृपा करून जीडीपीच्या तिमाही आकडेवारीवर जाऊ नका. ते सर्व बनावट आकडे आहेत. माझ्या वडिलांनीच सांख्यकी विभागाची स्थापना केली होती, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर काहीच परिणाम पडला नाही, अशी आकडेवारी देण्याचा या विभागावर दबाव आहे. 

पण मला भीती वाटत आहे. कारण मला माहीत आहे की, नोटाबंदीचा प्रभाव पडला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आकडेवारीचा अंदाज कसा काढला, असा प्रश्‍न मी सांख्यकी विभागाच्या संचालकांना विचारला होता. आम्ही दबावात होतो, त्यांनी आकडे मागितले आम्ही दिले, असे त्यावेळी त्या संचालकांनी मला सांगितले. त्यामुळे तिमाही आकड्यांवर विश्‍वास ठेऊ नका, असे आवाहन स्वामी यांनी केले.