Breaking News

शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर अनंतात विलीन

मुंबई : जम्मु- काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देतांना शहीद झालेले मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर प्रफुल्ल मोहरकर हे भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील रहिवासी होते. मेजर मोहरकरांच्या अंत्यदर्शानासाठी मोठ्या संख्येने जनसागर उसळला होता. 


शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव काल सायंकाळी सोनेगाव एअरफोर्स स्टेशनला आयएएफ एएन 32 या विमानाने आणण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सैन्य दलातील आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मोहरकर यांना सलामी देण्यात आली. शहीद मोहरकर यांच्या पत्नी अबोली मोहरकर यावेळी उपस्थित होत्या. पाकिस्तानी लष्कराने केरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. 

यात एका मेजर दर्जाच्या अधिकार्‍यासह चार जवानांना वीरमरण आले होते. शस्त्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन करत पाकिस्तानी सैनिकांनी केरी सेक्टरमध्ये गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी लष्कराला प्रत्युत्तर देतांना शनिवारी सायंकाळी मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले. प्रफुल्ल हे पवनी तालुक्यातील जुनोनाचे मूळ रहिवासी होते. त्यांचे आई-वडील शिक्षक-शिक्षिका असल्याने पवनीत राहिले. आठ वर्षांपूर्वी शहीद मोहरकर भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर पदोन्नती होऊन प्रफुल्ल मोहरकर मेजर पदावर पोहोचले. चार वर्षापूर्वी मोहरकर विवाहबद्ध झाले होते.