Breaking News

पशुधन पर्यवेक्षकांचे बहिष्कार आंदोलन

अहमदनगर : राज्यात पशुधन पर्यवेक्षक,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गतील कर्मचा-यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.पशुधन पर्यवेक्षकांची अनेक पदे रिक्त असून आहे त्या कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे. याशिवाय या संवर्गातील कर्मचा-यांचे पदोन्नती, प्रवास भत्ता असे विविध प्रश्‍न प्रलंबित आहेत. या प्रश्‍नांची तातडीने सोडवणूक व्हावी या मागणीसाठी पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचा-यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन दिले.सध्या आयएनएपीएच योजनेंतर्गत जनावरांच्या टॅगिंगचे काम सुरू आहे. मात्र टॅगींग मशिन निकृष्ट दर्जाचे असून जनावरांच्या ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यामुळे या टॅगिंगच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने घेतला आहे.


पशुधन पर्यवेक्षकांनी दिलेल्या निवेदनात शासनाने राज्यस्तरावर पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत,ग्रामसेवक,कृषी सहाय्यकांच्या धर्तीवर प्रवास भत्ता मंजुर करावा, राज्यात 12 वीनंतर तीन वर्षांचा पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करावा, पहिली व दुसरी कालबध्द पदोन्नती मंजुर करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.सध्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 वर एक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व एक परिचर असे दोनच कर्मचारी आहेत.या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात 10 ते 15 गावांचा समावेश आहे. या मोठ्या कार्यक्षेत्रात दैनंदिन कामकाज करताना व जनावरांचे आरोग्य सांभाळताना कर्मचायांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.काही ठिकाणी कर्मचा-यांवर दोन ते चार दवाखान्यांचा अतिरिक्त कारभार आहे.जनावरांची टॅगिंग व ऑनलाईन नोंदणी, पशुवैद्यकीय संस्था आय.एस.ओ.करणे अशा अतिरिक्त कामांमुळे उपलब्ध कर्मचा-यांवर ताण येत आहे. कर्मचा-यांवर या कामांसाठी दबाव टाकण्यात येत आहे.त्यामुळे टॅगिंग कामावर बहिष्कार टाकण्यात आला असून प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने पावले न उचलली गेल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.