Breaking News

एसटीतील दुग्धजन्य पदार्थांच्या वाहतुकीवरील बंदी उठवली


नागपूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्या दुग्धजन्य नाशवंत पदार्थांच्या एसटी बसमधील वाहतुकीवर निर्बंध आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हे रोखण्याच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांना 50 किलोग्रॅमपर्यंतची वाहतूक नि:शुल्क करण्यास तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या व्यावसायिक उत्पादकांनासुद्धा विहीत नियमानुसार वेष्टण करुन मालवाहतूक करण्याची अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.
सांगली येथील एसटी बसस्थानकावर पार्सल परवाना धारकाच्या कार्यालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीदरम्यान खवा, बर्फी इत्यादी दुग्धजन्य पदार्थ नाशवंत स्थितीत आढळून आले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे राज्यातील सर्व एसटी आगारे व पार्सल कार्यालयांना नाशवंत पदार्थांची वाहतूक न करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानुसार एसटी महामंडळाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्यास 15 नोव्हेंबर 2017 पासून बंदी घातली होती. पण यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले. 

ही पार्सल व्यवस्था पुन्हा सुरु करावी अशी मागणी लोकप्रतिनिधींकडूनही करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांना 50 किलोग्रॅमपर्यंतची वाहतूक नि:शुल्क करण्यास तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या व्यावसायिक उत्पादकांनासुद्धा विहीत नियमानुसार वेष्टण करुन मालवाहतूक करण्याची अनुमती देण्यात येत आहे, असे त्यांनी जाहीर केले. तसेच या प्रकरणात एस. के. ट्रान्सलाईन्स प्रा. लि., जळगाव या पार्सल परवानाधारकाचा परवाना तात्काळ प्रभावाने खंडीत करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.