Breaking News

गुजरातेत भाजपा सत्तेवर येणार नाही.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेतीन वर्षांत जी विकासकामे केली ते गुजरात निवडणुकीत मांडण्यात आले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याएवढे आमदार भाजपाला मिळणार नाहीत, असे भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले. मात्र, गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली तर, नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा मोठे नेते ठरतील, असेही काकडे यांनी सांगितले.
काकडे म्हणाले, २५ वर्षांपेक्षा अधिक काळ कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता राज्यांत टिकलेली नाही. ॲन्टी इंकम्बन्सी फॅक्टरमुळे भाजपा यावेळी गुजरातमध्ये सत्तेत येणार नाही. पटेल समाज प्रथमच भाजपच्या विरोधात गेला आहे. कॉँग्रेसने त्यांना एकत्र केले. भाजपाने ज्या प्रमाणात विकासाचे मुद्दे गुजरात निवडणुकीत मांडायला हवे होते, तसे मांडले गेले नाहीत. 

पक्षाच्या कामगिरीचा प्रचार केला गेला नाही. साडेतीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जी विकासकामे केली, ते गुजरात निवडणुकीत मांडण्यात आले नाही. झालेली आणि भविष्यात होणारी विकासकामे मतदारांसमोर मांडण्यात आली नाहीत. भावनिक मुद्द्यांवर निवडणूक झाली. त्यामुळे ॲन्टी इंकम्बन्सीचे वातावरण तयार झाले आहे.