नगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण उत्साहात.
याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, आरोग्य समिती सभापती डॉ. दानिश खान, गटनेते विश्वास मूर्तडक, नगरसेवक बाळासाहेब पवार, हिरालाल पगडाल, आरिफ देशमुख, नुरमोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, किशोर पवार, वसीम शेख, रिजवान शेख, इम्रान शेख, सोनाली शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींसह नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी आ. डॉ. तांबे म्हणाले, की आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा विकास झपाट्याने होतो आहे. नागरीकरण वाढले असून पुढील ५० वर्षांचे नियोजन करुन निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना पूर्ण करुन मोठे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरु असतांना संगमनेर नगरपरिषदेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे संगमनेर नगरपरिषद ‘स्वच्छ सर्व्हेक्षण’ स्पर्धेत सहभागी आहे. आपल्या घराची स्वच्छता करण्याबरोबर शहराची स्वच्छता करणे अतिशय अवघड काम आहे. संगमनेर शहराची स्वच्छतेचे काम अतिशय चांगले आहे. या कामासाठी नगराध्यक्षा तांबे व त्यांचे सर्व सहकारी पुढाकार घेत आहेत. शहरासाठी ‘स्वच्छता माता’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. शहर स्वच्छतेचे काम फक्त नगरपरिषदेचे नसून या उपक्रमात शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून करु या. ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करुन कचरा इतरत्र न टाकता घंटागाडीतचा टाकावा. ‘स्वच्छ सर्व्हेक्षणा’त सहभागी होण्याचे आवाहन आ. डॉ. तांबे यांनी शहरातील नागरिकांना केले.
यावेळी नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, की संगमनेर शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच व्यापार व इतर कारणांनी ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशावेळी माता भगिनींची कुचंबना होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील या ठिकाणी सुलभ शौचालयाची उभारणी करण्यात आली. स्वच्छता कामगारांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आज त्यांच्या हस्ते सुलभ शौचालयाचा लोकार्पण करत आहोत. दरम्यान, नगराध्यक्षा तांबे यांच्या दुरदृष्टीतून आज सफाई कर्मचार्यांचा खर्या अर्थाने सन्मान झाला आहे. त्यांच्या या निर्णयाचे कौतूक करुन भविष्यात नाटकीनाला बंदिस्त करुन त्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती पक्षप्रतोद विश्वासराव मुर्तडक यांनी दिली. याप्रसंगी रईस बेपारी, अफजल शेख, इम्रान शेख, घनश्याम जेधे आदींसह परिसरातील नागरिक, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.