Breaking News

मोबाइल चोराच्या धक्क्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू


मुंबई : उपनगरीय लोकल मार्गावरील प्रवाशांवर गेल्या काही दिवसांपासून होणारे वाढते हल्ले पाहता प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाइल चोराने दिलेल्या धक्क्यामुळे चालत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सॅण्डहर्स्ट रोड ते मशीद बंदर स्थानकादरम्यान घडली. या मोबाइल चोराला इतर प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
शुक्रवारी संध्याकाळी सीएसएमटी येथे कामावर जाण्यासाठी रुदाल निशद (३२, रा. मानखुर्द) या तरुणाने हार्बर मार्गावरील ट्रेन पकडली. संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास ट्रेन सॅण्डहर्स्ट रोड ते मशीद बंदर स्थानकादरम्यान आली असता, लोकलच्या डब्याच्या दारात उभ्या असलेल्या निशदकडील मोबाइल फोन खेचण्याच्या नादात मोबाइल चोराने त्याला धक्का दिला. त्या धक्का दिल्यामुळे चालत्या लोकलमधून निशद खाली कोसळला आणि मृत्युमुखी पडला.