राष्ट्रवादीचे सावलेश्वर टोल नाका वसुली बंद आंदोलन
सोलापूर,- मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सावलेश्वर टोल नाका वसुली बंद आंदोलन करण्यात आले.महामार्गावर अपघात झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, टोल नाक्यावर फक्त भुमीपुत्रांनाच नोकरी मिळावी, मोहोळ शहरासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
टोल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 12 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात टोल संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी देखील यावेळी करण्यात आली. यासह इतर मागण्यांसाठी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सावलेश्वर टोल नाका वसूली बंद आंदोलन करण्यात आले.या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनावेळी मोहोळ नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.