कृष्णा नदीकाठावरील बंधा-यानजीक मगरीच्या डोक्याचा भाग आढळला
सांगली, दि. 29, डिसेंबर - मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील कृष्णा नदीकाठावरील बंधा-यानजीक हत्या केलेल्या मगरीच्या डोक्याचा तुटलेला भाग आढळून आला. या प्रकाराने संपूर्ण नदीकाठावर खळबळ उडाली आहे. या मगरीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून अज्ञाताविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीकाठावरील बंधा-यानजीक सुमारे दहा फूट लांब व पाच वर्षे वयाच्या या मगरीच्या डोक्याचा भाग आढळला. या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच वन क्षेत्रपाल एम. व्ही. कोळी, वनरक्षक आर. एस. पाटील व मानद वन्यजीव संरक्षक पापा पाटील यांनी पंचनामा केला. अज्ञाताने धारदार शस्त्राने या मगरीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वीही भिलवडी- ब्रम्हनाळ येथून वाहत येऊन कसबे डिग्रज येथील बंधा-यात अडकल्याने महिन्यापूर्वी तुंग परिसरात एक मगर मृतावस्थेत आढळली होती. तिला विषबाधा झाली होती, की जाणीवपूर्वक विष घातले होते, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. याशिवाय जुनी धामणी (ता. मिरज) येथेही 13 दिवसापूर्वी अशाच पध्दतीने दोन मगरी मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. आता पुन्हा मगरीच्या डोक्याचा भाग आढळून आल्याने या कृत्यामागे अज्ञात टोळी कार्यरत असावी, अशी शंका प्राणीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.