सीमेवर गस्त घालण्यासाठी सैन्याकडून ऊंटाचा वापर !
चंदीगढ / वृत्तसंस्था : भारतीय सैन्य आता सीमेवर देखरेखीसाठी नव्या व्यूहनीतीचा अवलंब करत असून, त्यादृष्टीने भारतीय सैन्याने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. भारत-तिबेट-भूतान सीमेवरील चिनी सैनिकांनी गस्त वाढविल्यामुळे भारतीय सैनिकांनी नवीन रणनिती आखत लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष सीमा रेषेवर देखरेख वाढविण्यासाठी ऊंटांचा गस्तकार्यात वापर करण्याची योजना आखली आहे.
डोकलामध्ये दीर्घकाळापर्यंत तणाव कायम राहिल्यानंतर देखील चिनी सैनिकांच्या अतिक्रमणामुळे सैन्याने हा निर्णय घेतला. सध्या प्रायोगिक प्रकल्पांतर्गत ऊंटांद्वारे गस्त घातली जाईल. ऊंटांना गस्त घालणे आणि मोठया प्रमाणात शस्त्रास्त्री तसेच इतर सामग्री वाहून नेण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित केले जाईल. तेथे एक आणि दोन मदारींच्या म्हणजेच दोन्ही प्रकारच्या ऊंटांचा वापर केला जाईल. दोन मदारींचे ऊंट 180 ते 220 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकतील.
सैन्य सध्या या कामासाठी खेचरांचा वापर करते, जे 40 किलोग्रॅमपर्यंतच वजन वाहून नेऊ शकतात. एवढेच नाही तर खेचरांच्या तुलनेत ऊंटांचा वेग देखील अधिक असणार आहे. भारतात दोन मदारींचे ऊंट केवळ लडाखच्या नुब्रा खोऱयातच आढळतात. सध्या सैन्याला एक मदारी असणारे 4 ऊंट मिळाले आहेत. जर सैन्याचा हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरला तर भारतीय सैन्याकडून 12000 आणि 15500 फूटाच्या उंचीवरील भागांमध्ये ऊंटांचा वापर केला जाऊ शकतो. डीआरडीओच्या लेह येथील लेबोरटरी डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ हाय अल्टिटयूड रिसर्चने ऊंटांच्या भार वाहून नेण्याच्या क्षमतेबद्दलचे संशोधन सुरू केले आहे.