Breaking News

रस्ते अपघात मृत्यू २०२० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट- दिवाकर रावते


रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेमार्फत व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राज्यात मागील काही वर्षात व्यापक प्रयत्न करण्यात आले असून त्याचे फलस्वरुप म्हणून रस्ते अपघाती मृत्यूंचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले आहे. २०२० पर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची सहावी बैठक येथील विधानभवनात मंत्री श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन सहआयुक्त श्री. महाजन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, गृह, आरोग्य आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.