Breaking News

अ‍ॅसिडचा टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्ग तीन तास ठप्प

रत्नागिरी, दि. 25, डिसेंंबर - मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे साडेबाराच्या दरम्यान नायट्रिक अ‍ॅसिडचा टँकर उलटल्याने महामार्गावरची वाहतूक तीन तास ठप्प झाली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टँकरचालक आत्मासिंग अजितसिंग जवल (वय 58, मूळ पंजाब, सध्या रा. विक्रोळी मुंबई) हा आपल्या ताब्यातील टँकर (क्र. एमएच 04 -ईवाय 3343) घेऊन मुंबईहून खेड तालुक्यातील लोटे वसाहतीकडे निघाला होता. 

टँकरमध्ये दहा हजार लिटर नायट्रिक अ‍ॅसिड घेऊन होते. टँकर महामार्गावर खेड तालुक्यातील दाभीळ (लवेल अंजनी फाटा) येथे आला असता अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून टँकर रस्त्याच्या बाजूला कलंडला. अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी झाला. पहाटे सहा वाजता खेड व लोटे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने टँकरला रस्त्यावर काढले. त्यावेळी टॅन्करमधील नायट्रिक अ‍ॅसिड साठ्या प्रमाणावर रस्त्यावर सांडले गेले. त्यामुळे नायट्रिक अ‍ॅसिडचा हवेशी संपर्क येऊन मोठ्या प्रमाणावर पांढरा-पिवळा धूर रस्त्यावर पसरला गेला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली. लोटे वसाहतीतील अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेत पाणी व फोमचा मारा करत धुरावर नियंत्रण आणले. लोटे वसाहतीतील घरडा केमिकलच्या सेफ्टी टीमनेही सहकार्य केले. टँकर आणि रस्त्यावर सांडलेले नायट्रिक अ‍ॅसिड रस्त्यावरून बाजूला करत सकाळी सहा वाजता बंद झालेली महामार्गावरील वाहतूक नऊ वाजता सुरळीत करण्यात आली.
चालक आत्मासिंग जवल याला खेड येथे पुढील उपचारासाठी कळंबणीच्या रुग्मालयात दाखल केले आहे. अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.