Breaking News

संपादकीय - भाजप जिंकले; चर्चा मात्र राहूल गांधींची

नुकत्याच झालेल्या गुजरात व हिमाचलप्रदेशच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आले असून, त्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. मात्र हा विजय भाजपला सहजासहजी मिळालेला नसून, त्यासाठी भाजपला चांगलीच झुंज द्यावी लागली. काँगे्रसने हिताचलकडे दुर्लक्ष करत, गुजरातकडे प्रामुख्याने लक्ष दिले. वास्तविक गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला. 22 वर्षांपासून भाजपची सत्ता गुजरातवर आहे. त्यामुळे गुजरातमध्येच भाजपला कडवी टक्कर दिल्यास इतर राज्यात पाय पसरवणे सोपे जाईल, अशी काँगे्रसची धारणा होती. 


त्यामुळे काँगे्रसचा संपूर्ण फोकस हा गुजरात राज्यावर होता. गुजरात निवडणूकांला सुरूवात होण्यापूर्वींपासूनची पार्श्‍वभूमी बघितली असता, गुजरातमध्ये भाजप सहज 150 चा आकडा गाठेल, असे भाजपला सहज वाटले होते. त्यामुळेच तसे विधान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले होते. मात्र त्यांनतर काँगे्रसमध्ये झालेला बदल, राहूल गांधी यांनी आपली पप्पू प्रतिमा पुसत पंतप्रधान मोदी यांनी दिलेले कडव आव्हान यामुळे भाजपला काय करावे कळेना? अशीच स्थिती झाली होती. गुजरात हातातून जावू नये, यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसत गुजरातमध्ये जास्तीत जास्त सभा घेण्यावर भर दिला. तर दुसरीकडे विविध राज्यातील खासदार, केंद्रीय मंत्री यांचा राबता वाढलेला होता, तो केवळ प्रचारासाठी. भाजपने सर्व आयुधांचा वापर करत, गुजरातमध्ये सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला. 

150 चा आकडा सहज गाठू अशी धारणां असतांना, भाजपला कुठे फटका बसला, याचे आत्मचिंतन भाजप करेल. नोटाबंदी, जीएसटी यांचा फटका तर गुजरातमधील व्यापार्‍यांना बसला. त्यामुळे निवडणूकांत त्याचा रोष दिसून आला. मात्र हा रोष आतां ओसरतांना दिसून येत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात काँगे्रसला देखील आपल्या प्रचारात नवीन मुद्दे आणावे लागणार आहे. काँगे्रसने प्रचारात जान आणली होती. जिग्नेष मेवानी, अल्पेष ठाकूर, हार्दीक पटेल या त्रयीनीं आपली दखल घ्यायला लावली होती. पाटीदार बहूल लोकसंख्या असलेल्या भागात काँगे्रसला चांगली मते मिळाली आहेत. मात्र शहरी लोकसंख्या असलेल्या भागात काँगे्रसला मते खेचण्यात अपयश आले. जिग्नेष मेवानी हा अपक्ष म्हणून लढला आणि तो विजयी झाला. मात्र काँगे्रसने जर अजून जोर लावला असता, तर मात्र निवडणूकीचा हा सामना अटीतटीचा पहायला मिळाला असता. 

काँगे्रसकडे राहूल गांधी यांच्याशिवाय दुसरा चेहरा नव्हता. ज्यामुळे भाजपची मते सहज खेचता येतील. प्रियंका गांधी, सोनीया गांधी गुजरात निवडणूकांच्या प्रचारात कुठेही दिसल्या नाहीत. कदाचित राहूल गांधीचे व्यक्तिमत्व कणखर व्हावे, ते प्रकाशझोतात यावे यासाठी प्रियंका गांधी व सोनिया गांधी प्रचारापासून दुर राहिल्या असाव्यात. मात्र प्रचाराची धुरा एकहाती राहूल गांधीच्या हाती होती. आणि त्यांना संपूर्ण गुजरात पिंजून काढणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत काँगे्रसची एक मोठी फळी या प्रचारात दिसली असती, तर कदाचित काँगे्रस सत्ता काबीज करू शकली असती. भाजपने गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यात जरी निर्विवादपणे यश मिळविले असले, तरी चर्चा मात्र राहूल गांधीची आहे. यानिवडणूकांच्या निमित्ताने राहूल गांधीचे व्यक्तिमत्व उजळून निघाले. तसेच यानिमित्ताने भाजपला कोणीतरी कडवी झुंज देऊ शकतो, याचा प्रत्यय आला आहे. राहूल गांधी यांनी काँगे्रसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे येेणार्‍या काळात त्यांच्यासमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हान समोर असणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूकांच्या निमित्ताने काँगे्रस पक्षसंघटनेत नेमके कोणते आमूलाग्र बदल करतील, हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.