Breaking News

रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या सहाय्यक निबंधकांवर ठेवीदारांचा रोष

अहमदनगर : नगर शहरातील सावेडी परिसरात असलेल्या जुन्या रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या ठेवीदारांची रक्कम परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी थेट सहाय्यक उपनिबंधकांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर करीत त्यांनाच धारेवर धरले. दरम्यान या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई सुरू असल्याचा खुलासा सहाय्यक निबंधक हरिश कांबळे यांनी केला आहे. काही वर्षे सातत्याने आर्थिक अडचणीत असलेली रावसाहेब पटवर्धन सहकारी पतसंस्था काही वर्षांपूर्वीच प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेत विलीन करण्यात आली आहे. 


प्रवरा पतसंस्था ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालविली जाते.त्यामुळे विलीनीकरणानंतर आपले पैसे तातडीने मिळतील असा ठेवीदारांचा अंदाज होता.मात्र तरीदेखील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत.या पार्श्‍वभूमीवर संतप्त ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक हरिश कांबळे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे कधी व कशा प्रकारे परकत मिळतील अशी विचारणा ठेवीदारांनी केली.दरम्यान कांबळे यांनी ठेवीदारांची अडचण व सद्यस्थिती जाणून घेतली असून लवकरच ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे.