Breaking News

होर्डिंग्ज, अतिक्रमण प्रश्‍नी मनपा अधिका-यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचा इशारा

अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिंक स्थळे पाडण्याची व पाडलेली धार्मिक स्थळे पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करणा-यांविरूध्द न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखविणा-या महापालिका प्रशासनाने शहरातील अवैध होर्डिंग्ज व रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने दूर करावीत.अन्यथा मनपा अधिकार्यांच्या विरोधात आपल्या संघटनेतर्फे स्वत: पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करण्याचा इशारा जागरूक नागरिक मंच ने दिला आहे.


संघटनेचे अध्यक्ष सुहास मुळे,बाळासाहेब भुजबळ,पुरूषोत्तम गारदे,संजय वल्लाकट्टी,अभय गुंदेचा,नंदकुमार शिंदे आदिंनी महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले आहे.निवेदनात म्हटले आहे की,उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरातील 17 धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्याची कारवाई केली आहे.त्यापैकी 1-2 ठिकाणी काही जणांनी पुन्हा मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला. मनपा ने काही जणांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.नगर शहरात उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची सर्रास पायमल्ली होत आहे.

बेकायदा होर्डिंग्ज व फ्लेक्स बोर्ड लावणा-यांवर कारवाई करण्याचे तसेच रस्त्यांवर अतिक्रमणे करणा-यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.मात्र या आदेशांकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.जागरूक नागरिक मंचाने शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्ज व फ्लेक्सचे तसेच शहरातील अतिक्रमणांचे चित्रीकरण केलेले आहे.मनपा प्रशासनाने या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेऊन कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसांमध्ये सर्व पुराव्यांनिशी मनपा अधिका-याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा जागरूक नागरिक मंचाने दिला आहे.