Breaking News

संपादकीय - राजकारणांची खालावलेली पातळी...

गुजरात निवडणूकांचा रणसंग्राम संपला असला तरी, काँग्रेस आणि भाजप पुन्हा एकदा समोर आले आहे, ते निवडणूक आयोगांने काँग्रेससचे नेते राहूल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे. तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी येतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. या दोन घटनांमुळे काँग्रेस व भाजपा दोन्ही आक्रमक होत निवडणूक आयोगांकडे धाव घेतली. मात्र निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या रोड शो वर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप न घेतल्यामुळे, काँग्रेसने निवडणूक आयोगाला टॉर्गेट करत, निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसुत्री बाहूले असल्याचा गंभीर आरोप केला. 



वास्तविक निवडणूक आयोगाकडून वस्तुनिष्ठ व पारदर्शक भूमिका घेण्याची गरज आहे. व निवडणूक आयोग ती भूमिका पार पाडेलही यात शंका नाही. मात्र प्रश्‍न आहे, भाजप-काँग्रेसच्या संघर्षाचा. राहूल गांधी यांनी मुलाखत दिल्यामुळे, त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपचीच. तर दुसरीकडे रोड शो करत, शक्तीप्रदर्शन भाजपाने केले, तेही मतदानांच्या दिवशी. त्यामुळे काँग्रेसचा मिळपापड झाला नसता तर नवलच. एकीकडे भाजपची ओसरत चाललेली जादू, तर काँग्रेसने घेतलेली मोठी आघाडी, यामुळे दोन्ही पक्ष तुल्यबळ झाल्याचे दिसत आहे. वास्तविक या निवडणूकांच्या निमित्ताने अनेक राजकीय पैलू समोर आले.

निवडणूका या लोकशाहीतील महत्वाचे घटक आहे. मात्र निवडणूकांना सामोरे जात असतांना काही नैतिक मूल्ये पाळायचे असते, ते जवाबदार लोकशाहीसाठी महत्वाचा घटक आहे. मात्र निवडणूका या वैयक्तीक पातळीवर येऊन ठेपल्याचे स्पष्ट संकेत गुजरात निवडणूकांच्या निमित्ताने पाहायला मिळाले. वास्तविक पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, याची तथाकथित अश्‍लील सीडी समोर आणून, भाजप हा गुजरात जिंकण्यासाठी किती वैयक्तीक पातळीपर आला आहे, याची झलक बघायला मिळाली. 

त्यानंतर गुजरातच्या निवडूकीमध्ये भाजपला तगडे आव्हान निर्माण झाल्यामुळे भाजप नेत्यांचा तोल सुटला, ज्याला आवर घालणे महाकठिण होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीका आक्षेपार्ह, आणि त्यांचे चारित्र्यहनन करणारी होती. देशाच्या पंतप्रधानाने एका राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी 30-35 सभा घेणे किती योग्य आहे. पंतप्रधान हे पद देशातील प्रमुखाचे पद असून, संपूर्ण देशांचा कारभार हाकण्याऐवजी एका राज्यात सभा घेत प्रचारांसाठी वेळ देणे, किती योग्य आहे, हे पंतप्रधानच सांगू शकतील. वास्तविक काही महिन्यांपूर्वी गुजरात निवडणूक ही भाजपा एकहाती जिंकेल, असे भाजपला वाटले होते. 

मात्र प्रचारादरम्यान भाजपसमोर उभे ठाकलेले आव्हान कडवे असल्यामुळे, भाजपला देखील कोणती रणनिती आखावी याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप नेत्यांकडून वैयक्तिक पातळीवर राजकारण करण्यात वेळ खर्ची घातला. तर याउलट राहूल गांधी यांचे प्रत्येक वक्तव्य लोकशाहीला एका उंचीवर नेणारे संयमित विधान होते. त्यामुळे यापुढील निवडणूका लोकशाहीचे मूल्य राखत खिलाडूवृत्तीने होणे गरजेचे आहे. त्यात निवडणूक आयोगाने देखील निरपेक्ष भूमिका घेत, आपले अधिकार दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.