Breaking News

रेल्वे उपोषणाकडे यांनी फिरविली पाठ

                                 

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर ,नेवासा , शेवगाव तालुक्यांना वाहतुक ,पर्यटन आणि विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपुर्ण ठरणाऱ्या बेलापुर - परळी रेल्वेमार्गासाठी कुकाणा येथे ७ दिवस चाललेल्या आमरण उपोषणास विधानसभेच्या अनेक माजी सदस्यांनी भेट न दिल्याने त्यांच्या बाबत नागरीकांतुन तीव्र संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 
माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे , खा.सदाशिव लोखंडे , माजी आ.संभाजीराव फाटके व शेवटच्या दिवशी माजी खा. यशवंतराव गडाख वगळता आतापर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही माजी आमदाराने उपोषण स्थळी येण्याची तसदी घेतली नाही.माजी आ.तुकाराम गडाख, पांडुरंग अभंग,नरेंद्र घुल ,चंद्रशेखर घुले ,शंकरराव गडाख यांचे कार्यक्षेत्र व पुढिल राजकारण नेवासा ,शेवगाव तालुक्यातील जनतेवरच अवलंबुन आहे . मग त्यांना या व्यापक जनहिताच्या व प्रगतीच्या दृष्टीने महत्वपुर्ण प्रश्नाबाबत काहीच आपुलकी नाही काय ? अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असुन त्यांच्या अलिप्त व मौनवादी भुमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

बेलापुर - नेवासा - शेवगाव - गेवराई - माजलगाव - परळी रेल्वेमार्गासाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे १ डिसेंबर पासुन प्रकाश देशमुख ,कारभारी गरड ,रितेश भंडारी , निसार सय्यद ,सुरेश नरवणे ,महेश पुंड हे ६ जण आमरण उपोषणास बसले होते . कुकाणा व परिसरातील गावातील नागरीकांचा त्यास पाठिंबा होता. उपोषणाच्या ६ व्या दिवशी ६ पैकी ५ जणांना प्रकृती खालावल्याने नगर येथे सिव्हिल हाँस्पिटल मध्ये तातडीने हलविले होते .परंतु तेथेही एकाही माजी लोकप्रतिनिधीने साधी विचारपुस सुध्दा केली नाही .

मोठ्या प्रमाणात झाली जनजागृती -
कुकाणा येथील आमरण उपोषणामुळे नेवासा व शेवगाव तालुक्यात चांगलीच जनजागृती झाली. सुमारे १०० वर्ष रेंगाळत पडलेला हा मार्ग आता पूर्णत्वाला जाण्यास दिशा मिळाल्याने नागरिकांनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सुमारे १०० वर्षापूर्वीच्या प्रलंबीत प्रश्नाला जाहिरपणे प्रसिध्दी मिळाली.शासन प्रशासन व जनते पर्यंत हा प्रश्न पोहोचविण्यास सर्वच वाहिन्या व वृत्तपत्रांनी योग्य भुमिका बजावली. 

भारत स्वातंत्र्य होण्यापुर्वीच २५ वर्षे अगोदर इंग्रजांनी बेलापुर - नेवासा -शेवगाव - गेवराई - बीड - परळी अशा २३० कि.मी.च्या मार्गास १९२२ मध्ये मंजुरी मिळुन १९३६ पर्यंत जमिन अधिग्रहण करणे व रुळ टाकणे चालु होती . ते पुर्ण होण्यापुर्वीच भारत स्वतंत्र झाला. आणि पुढे काम ठप्प झाले. स्वातंत्र्यानंतर भारतीय शासन - प्रशासनाने या महत्वपुर्ण दळणवळण प्रकल्पाकडे पुर्ण दुर्लक्ष करत उदासिनता दाखवली. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील औद्योगिक ,शैक्षणिक ,कृषि , आर्थिक पर्यटन , तिर्थक्षेत्र विषयक विकास मागे पडला. आता काही वर्षांनी का होईना, हा रेल्वे मार्ग सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.