Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमीपुजन १ जानेवारीला.


जामखेड/प्रतिनिधी/- जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमीपुजन कार्यक्रम १ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अाहे.
नियोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी अभय महाजन,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह सबंधीत अधिकारी व राहूरी कृषी विद्यापीठाचे सबंधीत अधिका-यांनी कृषी महाविद्यालयाच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या भूमीपूजन समारंभाच्या नियोजित सभास्थळ, हेलिपॅड व वाहनतळाची पाहणी करण्यात आली. कृषी महाविद्यालयाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून,पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमास कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर,कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत , यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थीती असणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचा तालुक्यातील हाळगाव येथे भूमीपुजन कार्यक्रम होणार आहे. गेल्यावर्षी हाळगावला सरकारी कृषी महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर श्रीगोंदेकरांनीही हक्क दाखविल्याने वादाच्या भव-यात सापडलेल्या या कृषी महाविद्यालयाबाबत जनतेमध्ये तर्कवितर्क लढविले जात होते.मात्र पालकमंत्री प्रा शिंदे यांनी सर्व सोपस्कार पार पाडत हाळगावला कृषी महाविद्यालयाची मुहर्तमेढ रोवली आहे. 

हाळगावला होणा-या कृषी महाविद्यालयास ६० विद्यार्थी संख्येला मंजुरी आहे. या महाविद्यालयासाठी ६५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत. महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी व अन्य व्यवस्थापन खर्चासाठी तब्बल ६५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून , यापैकी १३ कोटी रूपये वर्ग झाले आहेत. हे काम येत्या दोन वर्षात पुर्ण करण्यात येणार आहे.या कृषी महाविद्यालयासाठी १०० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे.

कृषी महाविद्यालय होणार ग्रीन बेल्ट इमारत.
ग्रीन बेल्ट इमारत हे या कृषी महाविद्यालय इमारतीचे प्रमुख वैशिष्टय आहे. महाविद्यालयाची इमारत पर्यावरण पुरक इमारत बांधकामाचा नमुना असून , सदरची इमारतीचे बांधकाम करताना या बाबींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. प्रशासकीय इमारत , अध्यापन वर्ग इमारत , प्रयोगशाळा ,सुसज्ज संशोधन केंद्र व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह या बाबींचा यामध्ये अंतर्भाव असणार आहे.राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत होत असलेले हाळगावचे कृषी महाविद्यालय कर्जत ,जामखेड सह शेजारील मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागाला वरदान ठरणार असून , यामुळे या भागातील शेतक-यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे.