Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘माता-बाल संगोपन’ अॅप लाँच


नागपूर : ग्रामीण भागातील गरोदर महिला व बालकांच्या लसीकरणामध्ये सुलभता आणण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘माता-बाल संगोपन’ अॅपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. तसेच कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी तयार करण्यात आलेली ‘टी-सोबा’ (Tapal- Software for Best Administration) प्रणालीचे कार्यान्वितीकरण व‘स्वच्छमेव जयते’ पुस्तिकेचे विमोचनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, आमदार सर्वश्री प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, डॉ. परिणय फुके, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, आशिष देशमुख, सुधीर पारवेकर, सुनील केदार, डी. मल्लिकार्जुन रेड्डी, कृष्णा खोपडे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विविध विभागांचे प्रधान सचिव तथा सचिव, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

‘माता-बाल संगोपन’ अॅपद्वारे आई व बालकांची नोंदणी केल्यानंतर वेळापत्रकानुसार लसीकरणाचे अलर्ट प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती, माता-बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहितीसुद्धा या अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे.