दूध उत्पादनासाठी एनडीडीबीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार
रामगिरी येथे विदर्भ आणि मराठवाडासंदर्भात दुग्धविकास प्रकल्पाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते, भुपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख, कृषी सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला जिल्हास्तरावर संबंधित जिल्हाधिकारीसुध्दा जागा उपलब्ध करून देऊ शकतात, असे सांगून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले, राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघाला अधिक सक्षम करण्यासाठी सुध्दा प्रशिक्षण देण्यात येईल. मदर डेअरीला शासन सर्वतोपरी मदत करेल. या व्यवसायाबद्दल शेतकऱ्यांसोबतच गावातील नागरिक आणि सरपंचांनासुध्दा माहिती देणे गरजेचे आहे. मदर डेअरीसाठी राज्यातील जागांची आणि सुविधांची माहिती उपलब्ध करून द्यावी. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी देण्यात येईल. जलयुक्त शिवारच्या धर्तीवर जनावरांसाठी चारायुक्त शिवार राबविण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मदर डेअरी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून 25 लक्ष दूध संकलन होऊन त्याचे मार्केटिंग झाले पाहिजे. केंद्रातून या प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे चित्र नक्की बदलणार, असे गडकरी यांनी सांगितले.
