Breaking News

साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांचा अलोट जनसमुदाय


साईदर्शनासाठी गेल्या दोन दिवसांपासून शिर्डीत भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच आज {दि.२५} नाताळ असल्याने साईभक्तांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडेच ठेवण्यात आले होते.

नववर्षाचे स्वागत त्याबरोबरच असलेला नाताळ, शनिवार, रविवार सलग लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे अनेक साईभक्तांनी कुटुंबासह शिर्डीत राहणे पसंत केले. चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. एकावेळेस दर्शनापास घेण्यासाठी लागलेल्या रांगेमुळे संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने दर्शनसाठी पास सुरु केले. दर्शनपास घेतांना भाविकांचे खूप हाल मोठ्या झाले. पाससाठी, दर्शनासाठी, उदी घेण्यासाठी, भोजनासाठी अशा प्रत्येक बाबींसाठी भक्तांना रांग लावावी लागली. त्यामुळे भक्तांनी कशासाठी नक्की कितीवेळा रांगा लावायच्या, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

वाहतूक शाखेचे पोलीस पो. नि. दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३ दिवसांपासून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात येत होते. नाताळच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनालयात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी प्रसाद भोजनाचा आस्वाद घेतला. साईबाबा संस्थानच्यावतीने भक्तांसाठी चहापान, नाश्ता व स्वच्छतागृह आदींची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. विश्वस्त मंडळाने मोठ्या प्रमाणावर लाडू सेंटर सुरु केले आहे. त्यामुळे भक्तांना लागेल तितके प्रसाद पाकीट मिळत होते. गेल्या दोन दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणावर हॉटेलच्या खोल्या ‘बुक’ झाल्या होत्या. साईआश्रम, नवीन भक्त निवास, साईधर्मशाळा याठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. वाहतुकीच्या नियोजनासाठी पोलीस मोठे प्रयत्न करीत होते. पाकीटमारी अथवा इतर काही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेण्यात आला होता. गर्दीच्या काळात टाईम दर्शन यामुळे भाविकांचे हाल झाले.