Breaking News

भातपिकाच्या हमीभावासाठी कोकणातील शेतक-यांचे गुरुवारपासून नागपुरात उपोषण

ठाणे, दि. 19, डिसेंबर - भातपिकाला 4 हजार रुपये हमी भाव देण्यात यावा, या मागणीसाठी कोकणातील शेतकरी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात उपोषणाला बसणार आहेत. रमेश हिंदूराव यांच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी गुरुवारपासून 21 डिसेंबरपासून उपोषणाला बसणार आहेत. 

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. सुमारे 11 प्रकारची मशागत करुन हे पीक घेतले जात असून त्यासाठी एकरी सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च शेतक-यांना करावा लागत आहे. मात्र, सरकारकडून केवळ 1 हजार 500 रुपयांचा हमीभाव दिला जात आहे. तसेच, ही हमीभाव केंद्रे जानेवारीमध्ये सुरु केली जात असल्याने भाताची साठवण करण्याचीही मोठी समस्या शेतक-यांसमोर उभी ठाकत आहे. 

या संदर्भात मुरबाड तालुक्यातील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव यांनी अनेकवेळा शासन दरबारी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, शासनाने कोकणातील शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी नोव्हेंबर महिन्यात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. मात्र, त्याकडेही शासनाने लक्ष न दिल्याने 21 डिसेंबरपासून हिंदूराव यांच्या नेत ृत्वाखाली शेकडो शेतकरी नागपूर येथील यशवंतराव स्टेडीयमसमोर उपोषणाला बसणार आहेत.