Breaking News

आकाशगंगेच्या कृष्णविवरात सापडले जवळचे तारे

न्यूयॉर्क : खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेच्या विशालकाय कृष्णविवरापासून तीन प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ११ प्रोटोस्टारचा शोध लावला आहे. हे प्रोटोस्टार वायूच्या ढगांपासून ताऱ्याची निर्मिती होण्याच्या टप्प्यात आहेत. हे तारे वजनाला हलके असतात. 


अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या प्रोटोस्टारचा शोध लावला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णविवरातून निघणारे बल भरती-ओहोटीप्रमाणे असते. ते ताऱ्याच्या निर्मितीच्या आधी धूळ आणि वायूने भरलेल्या ढगांना वेगळे करते. आता या संशोधनातून असे लक्षात आले आहे की, सूर्यासारख्या ताऱ्यांची निर्मिती प्रतिकूल क्षेत्राही होऊ शकते. 

चिलीमधील एएलएमए दुर्बिणीच्या मदतीने या प्रोटोस्टारचा शोध घेण्यात आला आहे. अजून विकसित होत असलेल्या या युवा ताऱ्याचे वय सुमारे सहा हजार वर्षे आहे. ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ युसूफ जादेह यांनी सांगितले की, आम्ही सर्वात प्रतिकूल परिस्थितीमध्ये ताऱ्यांच्या निर्मितीचा सुरुवातीच्या टप्प्याची ओळख करण्यात यश मिळविले आहे.