Breaking News

सोशल मीडियात विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली चालतोय स्वैराचार


राज्यघटनेनुसार सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.आपले विचार मुक्तपणे मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.सोशल मीडिया सर्वासाठी खुले असल्याने त्याचा वापर विधायक विचार प्रकटीकरणापेक्षा स्वैराचार माजविण्यासाठी होत असल्याचे प्रकार वाढले आहेत.सोशल मीडियावर अधिक 'सामाजिक' बनण्याच्या स्पर्धेत चमकोगीरीच समोर येताना दिसते.
बोटावर मोजण्याएवढे सकारात्मक काम आणि बाकी सर्व नकारात्मक, त्रासदायक आणि गुन्हेगारी स्वरूपाची कृत्यच या मीडियात चालत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य तत्वावर लोक मीडियात व्यक्त होत आहेत.घटनेने दिलेले स्वातंत्र्य मान्य आहे,मात्र त्याचा गैरवापर होवुन स्वैराचार सुरु असेल तर मात्र या वळूला वेसण घालण्याची गरज आहे.

बातम्या आणि माहितीच्या प्रसारणासाठी एकेकाळी फक्त प्रसारमाध्यमांवर अवलंबून रहावे लागत होते.छापील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या या स्वरूपातील हा मीडिया सुरुवातीपासूनच चौकटीत बांधलेला आहे.काही सरकारी नियम आहेत तर काही या प्रसारमाध्यमांनी स्वतः ठरवून घेतलेली नीतीमूल्य आहेत.त्यामुळे प्रसारित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या परिणामांचा विचार होतो,त्याची जबाबदारी निश्चित असते. आणि विश्वासार्हताही असते.सोशल मीडियाचा कारभार मात्र अनियंत्रितच आहे.उलट प्रसारमाध्यमांवर बातम्या दाबल्याची टीका करून कोणतीही खात्री नसलेला,कधी चुकीचा,कधी चिथावणीखोर मजकूर यावरून प्रसारित होत असल्याचे दिसते.मजकूर पोस्ट करणारा प्रत्येक जण स्वतः वार्ताहर आणि संपादकाच्या भुमीकेत वावरतांना दिसतो.आलेला मजकूर पुढे पाठविण्याच्या नादात याची अंतिम जबाबदारी आपली आहे हे देखील तो विसरुन जातो.एखादी चुकीची पोस्ट प्रसारित केली जाते. तेव्हा पुढे आग लागते आणि मागे जबाबदारी घ्यायला कोणीच नाही,अशीही अवस्था असते.अशा पोस्टला उत्तर द्यायचे झाले,दुरूस्ती किंवा खुलासा द्यायचा झाला तर तोही शक्य होत नाही कारण वेळ निघून गेलेली असते.

सोशल मीडियाचा बोलबाला पाहून काही राजकीय पक्षांनी, व्यक्तींनी यासाठी पगारी नोकर ठेवून प्रतिमा उंचावणे,त्यांच्यावर होणारी टीका खोडून काढणे आणि विरोधकांवर केवळ टीकाच नव्हे,तर त्यांची निंदानालस्ती करणे अशी कामे सुरु केल्याचे दिसते.तर अनेक कट्टर समर्थक, कार्यकर्ते अशी कामे स्वयंस्फूर्तीने बिनपगारी करताना दिसतात.सोशल मीडिया उपयुक्त ठरू लागल्याचे दिसताच राजकीय पक्षांनी यासाठी स्वतंत्र सेल तयार केलेले दिसतात.

राजकीय चर्चेसोबतच वैयक्तिक पातळीवर एखाद्याला त्रास देण्याचे प्रकारही यातुन होताना दिसतात.दुसऱ्याचे श्रेष्ठत्व न स्विकारणे,जातीय विष पेरणे,धार्मिक तेढ निर्माण करणे, भावना भडकावणे असे प्रकारही यावर चालतात.व्हाट्सप,फेसबुक आदीवर बेसलेस चर्चांना उधाण आल्याचे चित्रही अनेकदा दिसते.आपल्या हाती मोठे शस्त्र मिळाले आहे,त्यामुळे आपण फार मोठे झालो,अशा अर्विभावात आपली लायकी नसताना थेट प्रश्न उपस्थित करुन नाहक त्रास देण्याचे प्रकारही घडत आहेत.

पोस्टचा हैदोस-
-व्यक्ती हरवल्याच्या पोस्ट, अपघातांच्या आणि त्यांना मदतीच्या पोस्ट वर्षानुवर्षे फिरत राहतात.एवढेच नव्हे, तर काही उपद्रवी मंडळी त्यांचे स्थळ आणि नावेही बदलून गोंधळात आणखी भर टाकतात.कारण येथील सर्व व्यवहारच बेजबाबदार असतो. विघ्नसंतोषी मंडळीना फक्त गोंधळ माजवायचा असतो.अशा लोकांना जर चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला नाही,तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर ते गोंधळ माजविण्यासाठीच अधिक करण्याची शक्यता आहे.

पेस्टचा वाढता जोर-
कॉपी पेस्ट ही अतिशय सोपी पद्धत या मीडियासाठी उपलब्ध आहे,ती सर्वांत घातक आहे.स्वस्तात वापरायला मिळणारे इंटरनेट आणि सोबतीला कॉपी पेस्टचा पर्याय यामुळे प्रत्येक जण आपला मेंदू आणि बोटांवरील नियंत्रण हरवून बसला आहे.एखादी पोस्ट आली की,दे पुढे पाठवून,असाच हा प्रकार आहे.मीडिया सुरू झाला तो वेगळ्या उद्देशाने.त्याचा एवढा गैरवापर होईल,असे तेव्हा वाटलेही नसेल.अधिकृत प्रसारमाध्यम सुरू करण्यासाठी खूप सारे नियम आहेत.मात्र, सोशल मीडियात ग्रुप तयार करून माहिती प्रसारित करणे तुलनेने सोपे असल्याने त्याचा वापर वाढत चालला आहे.

-तत्पर दुनियादारी !
आपल्याकडे मित्रमैत्रिणींचा मोठा लवाजमा आहे.सामाजिक स्तरावर आपण खुप उंचावलेलो आहोत याचा आभास निर्माण करण्याची धडपड करणारेही काही संख्येने कमी नाही.वाढदिवसी स्तुतीसुमने उधळुन एकप्रकारे दुसऱ्यावर उपकार करुन ठेवायचे.काव्यपंक्तीत नाव वापरुन आपण कसे दुनियादारीत तत्पर आहोत. असा भास निर्माण करुन चांडालचौकडी तयार करुन राजकारण व इतरत्र सोयीनुसार वापरायची असे उद्योगही सोशल मीडियात होतांना दिसतात.