Breaking News

नागरिकांचा सहभाग वाढल्यास नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर होईल - आयुक्त

नवी मुंबई, दि. 17, डिसेंबर - नागरिकांचा सहभाग वाढल्यास नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर होईल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. स्वच्छता स्पर्धेतील सहभाग हे निमित्त असून या माध्यमातून शहरात स्वच्छतेची संस्कृती रूजणे आवश्यक आहे. त्यातून स्वच्छ व आरोग्यपूर्ण शहर अशी नवी मुंबईची ओळख निर्माण व्हावी असा सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या वेळी केले. 


या वेळी महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आयुक्त म्हणाले की, मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2017 साली देशातील 431 शहरे सहभागी झाली होती; मात्र या वर्षी 2018 सालात 4 हजार 41 शहरे सहभागी झाली आहेत. यामुळे महापालिके पुढे मोठे आव्हान असले,तरी नागरिकांनी या मोहीमेत सहभाग वाढल्यास नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर होईल. मागील वर्षी नवी मुंबई महापालिकेने राज्यात पहिल्या व देशात आठव्या क्रमांकावर बाजी मारली असल्याने आपले शहर सुनियोजित विकसित शहर असल्याने आपण अव्वल क्रमांक पटकावला पाहिजे अशा अनेकांच्या अपेक्षा अपेक्षा आहे. 

त्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका शहर स्वच्छतेसाठी सर्वस्तरावर प्रयत्न करत आहे. यामध्ये नगरसेवक, सोसायट्या यांच्या कार्यशाळा घेणे, स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये नागरिकांना सहभाग वाढावा यासाठी स्वच्छ सोसायट्या, शाळा,हॉटेल्स,स्वच्छ प्रभाग आदी आठ गटांमध्ये स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून लवकरच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी शहरातील सर्व शाळांमध्ये साडेचार लाख शुभेच्छा पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.