Breaking News

कोल्हापूरच्या विद्यार्थीनींची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली भेट


मुंबई : शाळेचा गृहपाठ केला नाही म्हणून शाळेत ५०० उठाबशा काढायला सांगितलेली विद्यार्थी विजया निवृत्ती चौगुले सध्या केईमएम रुग्णालयात उपचार घेत आहे. विजयाच्या उपचाराचा खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे सांगितले. श्री.तावडे यांनी आज सकाळी केईएम रुग्णालयात जाऊन विजया चौगुले हिची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान तिच्यावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.रावत आणि डॉ.प्रविण बांगर यांच्याकडून तिच्या उपचाराची माहिती श्री.तावडे यांनी यावेळी घेतली.
विजया चौगुले हिची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्री.तावडे यांनी सांगितले की, तिच्यावरील उपचाराबाबत विजयाचे कुटुंबिय समाधानी आहे. विजया लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा कोल्हापूरच्या शाळेत जाऊ शकेल. पण विजयाची पुन्हा त्याच शाळेत जाण्याची मानसिकता नसेल तर तिला तेथून जवळच्या दुसऱ्‍या शाळेत प्रवेश देण्यात येईल. 

राज्य शासन विजयाच्या पाठीशी उभे असून विजयाच्या उपचारावरील संपूर्ण खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येईल.विजयाबरोबरच विजयाचे वडील त्याच शाळेत शिपाई पदावर नोकरीला असून त्यांनाही त्या शाळेत नोकरी करायची नसेल तर त्यांनाही बाजूच्या शाळेत समायोजित केले जाईल, असेही श्री.तावडे यांनी यावेळी सांगितले.