मंत्र्यांना आपली करुण कहाणी सांगूनही प्रश्न न सुटल्याने शेतकर्याची आत्महत्या.
वाशिम: मंत्र्यांना आपली करुण कहाणी सांगूनही प्रश्न न सुटल्याने वाशिममध्ये एका शेतकर्यांने आत्महत्या केली. ज्ञानेश्वर मिसाळ असे या 55 वर्षीय शेतकर्याचे नाव आहे. वाशिममधील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर नारायण मिसाळ यांनी 6 डिसेंबर रोजी यवतमाळला जाऊन तिथे विष प्राशन केले. ज्ञानेश्वर यांच्यावर बँकांचे कर्ज होते, या प्रकरणी त्यांनी 27 नोव्हेंबरला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन आत्महत्येचा इशारा दिला होता.
मात्र यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यानं ज्ञानेश्वर यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. ज्ञानेश्वर यांच्यावर आयसीआयसी बँकेचं 3 लाखांचं, महिंद्रा फायनान्सचं अडीच लाखांचं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दीड लाखांचे कर्ज होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी आपले आयुष्य संपवले.
ज्ञानेश्वर मिसाळ यांनी आत्महत्या पूर्वी पत्र लिहिल होते, त्यात म्हटले आहे की, विदर्भात जर कारखाने असते, तर गावातील 200 ते 250 कास्तकरांना पुणे-मुंबई पोट भरण्यासाठी जायची वेळ आली नसती. विदर्भ वेगळा झाला असता तर ही वेळ आली नसती. खरोखर आम्हाला मेट्रो नको आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग पाहिजे. शेतात तोटा झाला तरी बँकेचे व्यवहार नीट ठेवल्याने मी कर्ज मुक्तीमध्ये बसलो नाही. व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय हेच कळत नाही.
