Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना सश्रम कारावास

ठाणे, दि. 01, डिसेंबर - मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सुरेश शामू प्रजापती (21) आणि मनोज छोटेलाल माळी (22) यांना दोषी ठरवत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमुर्ती एस सी खलिपे यांनी साक्षीपुरावे ग्राह्य धरीत या निर्णयाची सुनावणी केली. 


प्रजापती याला 7 वर्ष सश्रम कारावास आणि 45 हजाराचा दंड तर दुसरा आरोपी माळी याला 5 वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजाराचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच, दंडाची 50 हजाराची रक्कम पीडित मुलीच्या वडिलांना द्यावी, असा निर्णयही न्यायालयाने दिला.

आरोपी सुरेश प्रजापती आणि मनोज माळी यांनी 28 सप्टेंबर,2011 रोजी इयत्ता नववीमध्ये शिकणार्‍या 14 वर्षीय मुलीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून नेले. तिच्यावर अत्याचार करून दुसर्‍या दिवशी तिला कळवा स्थानक परिसरात सोडून गेले होते. रात्री मुलगी घरी आली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. मुलगी घरी परत आल्याने तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड करण्यात आले.