Breaking News

कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी अधिवेशन संपण्यापूर्वी घोषित करणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे

दिनांक १ व २ जुलै, २०१६ अन्वये मूल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. तसेच ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांची यादी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी ही पात्र यादी घोषित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी आज विधान परिषदेत घोषित केले. 


२० टक्के अनुदान प्रकरणी मंत्रिमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील अनुषंगिक कार्यवाही तात्काळ केली जाईल, असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.१४ जून २०१६ पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अटी व शर्तींच्या अधीन राहून २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय ३० ऑगस्ट २०१६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, तोच निर्णय १ व २ जुलै, २०१६ च्या पात्र शाळांसाठी लागू राहील, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुद्दा मांडला होता. त्यास उत्तर देताना श्री. तावडे यांनी ही माहिती दिली.