Breaking News

महिलेला जीवे मारण्याची धमकी, माजी उपसभापती अंकुश ढवळे यांचा ‘पराक्रम’


जामखेड ता. प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपरखेड येथील वैशाली राहूल पवार या महिलेला जामखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश ढवळे यांनी जीवे मारण्याच्या धमकी देण्याचा पराक्रम केला आहे. महिला आणि मुलींवर अत्याचाराचे प्रकार ताजे असतांनाच ढवळे यांच्या पराक्रमाने यात भर पडली आहे. या दुष्कृत्यामुळे ढवळे यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या महिलेच्या भावाने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 
या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. ढवळे हे या महिलेवर अन्याय करत असून या प्रकाराला या महिलेने दि. १० नोव्हेंबर रोजी ‘रोगर’ हे विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या महिलेवर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु चालू असताना दि. १२ रोजी दवाखान्यात या महिलेचा जबाब घेण्यात आला. त्या जबाबावरून जामखेडचे माजी उपसभापती अंकुश ढवळे यांच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात {८६९/२०७ भादंवि ५०६} अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. 

पिंपरखेड येथे या महिलेच्या शेतात ढवळे यांनी व्यायामशाळेसाठी नवीन बांधकाम सुरू केले. मात्र या महिलेने ढवळे यांना माझ्या शेतात तुम्ही बांधकाम करू नका, असे सांगितले. या महिलेच्या अडथळ्यामुळे सदर व्यायाम शाळेचे बांधकाम अर्धवट झाले. त्या अर्धवट व्यायामशाळेच्या इमारतीमध्ये ढवळे यांनी लिंबूची आडत सुरु केली. यासाठी सदर महिलेने ढवळे यांना विरोध केला आडत सुरु करु नका, असे सांगितले. परंतु, ‘मी आडत बंद करणार नाही, तुला काय करायचे ते कर, तु आमच्या नादी लागली तर तुला जीवे ठार मारून टाकू’ अशी धमकी दिली. यामुळे महिलेने विषारी औषध घेतले होते.

दरम्यान, याप्रकरणी अंकुश विठ्ठल ढवळे, पांडुरंग विठ्ठल ढवळे, विशाल दादाराम गाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दि. २७ रोजी या महिलेचा भाऊ नितीन काशीनाथ चोरगे यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की जामखेड पोलिस ठाणे आणि बिट अंमलदार आमची फिर्याद दाखल करून घेत नाहीत. माझी विधवा बहीण वैशाली पवार ही विधवा झाल्यापासून माझेकडेच पिंपरखेड येथे राहत आहे. माझे बहिणीने दस्त क्रमांक {२१३४} ने दि. २४ नोव्हेंबर २०१४ रोजी लक्ष्मण बाळु मडके यांच्याकडून नोंदणीकृत खरेदीखताने शेती घेतली. 

तेव्हापासून ती वहिवाट करीत असलेल्या सदरील क्षेत्राचा गट नंबर ४३१ असून क्षेत्र ८० आर आहे. पिंपरखेड या आमच्या गावात काँग्रेसचे पुढारी व जामखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश ढवळे हे आडमुठ्या स्वभावाचे आणि आडदांड आहेत. त्यांचा मोठा जमाव आहे. त्यांच्यापासून माझ्या बहिणीच्या जीविताला धोका आहे. माझ्या बहिणीने खरेदी केलेली शेतजमीन मिळकतीमध्ये ढवळे यांनी त्यांचा कसलाही संबध नसताना अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. याबाबत हरकत केली असता दादागिरीची भाषा वापरून ‘तुला मी नीट राहू देणार नाही, तु विकत घेतलेली जमीन मिळकत ही वहिवाट देणार नाही, ती जमीन मी हडपणार आहे, काय करायचे ते कर, माझे मंत्रालयापर्यंत हात पोहचलेले आहेत. 

माझे कोणीच काहीच करू शकत केवळ राजकीय प्रभावामुळे पोलिस ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन दादागिरी करणाऱ्या राजकीय पुढारी व पंचायत समितीचे उपसभापती ढवळे गुन्हा दाखल करून घेण्याचे जामखेड पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.