Breaking News

जव्हारमध्ये 21 जणांना डेंग्यूची बाधा

पालघर, दि. 01, डिसेंबर - जव्हार तालुक्यातील बाळकापरा गावात डेंग्यूची साथ पसरली असून बाधित झालेल्या 21 रुग्णांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये तिघांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या आजाराविषयी माहिती नसल्याने गावकरी भितीच्या छायेखाली वावरत आहेत.

तालुक्यापासून अगदी 10 कि.मी. अंतरावर असलेल्या बाळकापरा गावात गत आठवड्यापासून डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यातच मलेरिया आणि टाईफाईडचे रुग्णही आढळले आहेत. गावात 140 कुटुंब राहत असून, काही दिवसांपासून येथे हिवतापाचे रुग्णही आढळले आहेत. ज्या रुग्णांना ताप येतो त्या संशयित रुग्णावर प्राथमिक उपचार करून लगेच जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले जात आहे. गावातील 18 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या साथीमुळे ताप येणे, गुढग्याचा सांधा दुखणे, डोकेदुखी, हातपाय चावणे, हिवतापामुळे थंडी भरणे अशी लक्षणे गावातील रुणांमध्ये दिसत आहेत. त्यातच या गावामध्ये आरोग्ययंत्रणेच्या मलेरिया विभागाच्या क र्मचार्‍यानी आणि तालुका आरोग्य यंत्रणेच्या स्वयंसेवकांनी गावात ठाण मांडून जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. 

गावातील 9 रुग्णांच्या रक्ताचे नमुने डहाणू येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात गोविंद पांडुरंग गाडगे (60), भाऊ गोविंद गडगे (35), द्वारकी काशिनाथ तुंबडा (65) यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य यंत्रणांनी गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी जव्हार कुटीर रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये पाठविले  असल्याची माहिरी डॉक्टरांनी दिली. दरम्यान डॉक्टरांनी विहिरीचे पाणी स्वच्छ असल्याचा प्राथमिक निर्वाळा दिला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेकडून गावात सर्वत्र साठविलेल्या पाण्याची पाहणी ते रिकामे करण्याचे निर्देश गावकर्‍याना दिले आहेत. गावात फॉगिंग मशीनने फवारणी करावी असे ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे गावकर्यानीही घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवून परिसरामध्ये कुठेही पाणी साठवू नये तसेच पाणी उकळूनच प्या अशा विविध सूचना केल्या आहेत.