Breaking News

राज्यात एक कोटी लोकांची मौखिक आरोग्य तपासणी - डॉ. दीपक सावंत


सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने मौखिक आरोग्य तपासणी मोहीम 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पास उत्स्फूर्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असून १९ डिसेंबरपर्यंत राज्यात एक कोटी लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत सांगितले.
मौखिक आरोग्य तपासणी मोहीम मुख्यत: जनतेला मौखिक आरोग्याचे महत्व कळावे यासाठी सुरू केलेली आहे. या तपासणी मोहिमेत पहिल्या टप्प्यात फक्त मौखिक स्वच्छता आणि पूर्वव्रण आहेत का, यासाठी मौखिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विशेषज्ञ उपचार आवश्यक असणाऱ्या रूग्णांच्या सर्व तपासण्या करून निश्चित निदान करण्यात येणार आहे व तिसऱ्या टप्प्यात कर्करोगाच्या निदान निश्चित केलेल्या रूग्णांना उपचार देण्यात येणार आहेत.

भारतामध्ये मौखिक कर्करोग हा सामान्यत: आढळणारा कर्करोग आहे. मौखिक पूर्व कर्करोगांच्या लक्षणांचा तपास करणे ही साधी व सोपी पद्धत आहे. जर प्राथमिक अवस्थेत मौखिक कर्करोगाचे निदान, कर्करोग पूर्व लक्षणामध्ये झाले तर कर्करोगाचा बरा होण्याचा दर 70 ते 75 टक्के आहे. तंबाखूचे सेवन करणे हे मौखिक कर्करोगाचे प्रमुख कारण असल्यामुळे मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेबरोबर तंबाखूच्या दुष्परिणामांबाबतही जनजागृती मोहिमसुद्धा या कालावधीत राबविली जात आहे. ही मोहीम टाटा मेमोरियल हॉस्पीटल, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र डेंटल असोसिएशन, इंडियन कॅन्सर असोसिएशन यांच्या सहकार्याने सुरू असल्याचे डॉ. सावंत यांनी निवेदनाद्वारे सांगितले.