Breaking News

येत्या २४ डिसेंबरपासून कोल्हापूर-मुंबई हवाई प्रवास

मुंबई / नवी दिल्ली : उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेली सहा वर्षे बंद असलेली कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा केव्हा सुरु होणार हा कोल्हापूरवासियांना प्रश्न पडला होता. त्यावर आता अंतिम शिक्कामोर्तब झाले असून येत्या २४ डिसेंबरपासून ही सेवा सुरु होणार असून ही सेवा दर मंगळवार, बुधवार व रविवारी असणार आहे आणि गुरुवारपासून या विमानसेवेचे टिकीट प्रवासी बुकिशकतात अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एयर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी खासदार संभाजीराजे यांना बुधवारी दिली. खा.संभाजीराजे यांनी केंद्रीयमंत्री अशोक गजपती राजू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानसेवा सुरु होण्याबद्दल संपूर्ण कोल्हापूर वासियांतर्फे आभार मानले. 


एयर डेक्कनची ही विमानसेवा दर मंगळवार, बुधवार व रविवारी असून मुंबईवरून दुपारी १:१५ वाजता कोल्हापूरसाठी विमान उडान भरेल आणि दुपारी २:३० वाजता ते कोल्हापूरला पोहोचेल तसेच याच दिवशी दुपारी ३:२५ वाजता कोल्हापूर वरून हे विमान मुंबईसाठी उडान भरेल आणि दुपारी ४:४० वाजता मुंबईला पोहोचेल अशी माहिती सुद्धा एयर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी संभाजीराजे यांना दिली. उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरु होण्यास विलंब होत होता. याच संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीपासूनच ही सेवा सुरु होण्यासाठी मुंबई व दिल्ली येथे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता गेल्याच आठवड्यात त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली होती. दिनांक २५ व २६ ऑक्टोबर रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्या संयुक्त पथकाने कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली होती या पाहणीचा अहवाल सादर झाल्यानंतर डीजीसीएने कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना दिला आहे. 

येत्या २४ डिसेंबरपासून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. कोल्हापूर विमानतळ हा फार वर्षापासून रखडलेला विषय होता तो मार्गी लावण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दि. १० ऑगस्ट २०१६ रोजी भेट घेवून कोल्हापूर विमानतळ संदर्भात जमिन संपादन व इतर काही अडचणी आहेत या संदर्भात सविस्तर इतिवृतांत मंत्री महोदयांस निदर्शनास आणून दिला होता. तसेच कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी विमानतळ सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे याबाबतचे निवेदन ही खासदार संभाजीराजे यांनी दिले होते. त्यावेळी नागरी वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यावर योग्य ते उपाय करण्याचे आदेश दिले होते. उडाण योजनेमुळे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून निश्चितपणे गुंतवणूक वाढेल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने कोल्हापूर हे महत्वपूर्ण शहर असून या कनेक्टिव्हिटीमुळे मोठा फायदा जिल्ह्याला होईल असा विश्वास खा.संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला.