फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अट्टल सोनसाखळी चोरांना पकडले
पुणे, दि. 24, डिसेंबर - गस्तीवर असणा-या पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणा-या दोघा सोनसाखळी चोरांना पुणे पोलिसांच्या युनिट दोनच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्यांनी सोनसाखळी चोरीचे सहा गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक बजाज पल्सर दुचाकी असा 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. राहुल नातु सोळंकी (वय-20), विक्की काशिनाथ म्हस्के (वय-20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी हे अट्टल सोनसाखळी चोरटा आणि सध्या मोका अंतर्गत तुरूंगात असलेला इम्रान जाफर इराणी याचे साथीदार आहेत. पुर्वी ते इम्रान याला दुचाकी चोरून देण्याचे आणि त्याच्याकडे चालक म्हणून काम करत असत. अटक केलेल्या दोघांवरही यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.
