Breaking News

ओखी बाधितांना मदतीचे आश्‍वासन

ओखी वादळामुळे बाधित झालेले शेतकरी आणि मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. याबाबत सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या नियम 97 वरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. 


कडधान्य पिकाचे सुमारे 300 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, यासर्व बाबीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 4 हजार 100 रुपये, पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 9 हजार 600 रुपये, अंशत: नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी 2 हजार 100 रुपये तर पूर्णत: नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी 2 हजार 600 रुपये मदत देण्यात येईल. नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी 6 हजार 800 रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी 13 हजार 500 रुपये तर बहुवार्षिक फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्यात येईल.