Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा नाशिक महापालिकेवर जवाब दो मोर्चा

नाशिक, दि. 16, डिसेंबर - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या जनतेची दिशाभूल करत मनमानी पद्धतीने कारभार करणार्‍या महापालिका सत्ताधार्‍यांना जाब विचारण्यासाठी साधारणतः दोन ते तीन हजार कार्यकर्त्यांचा जबाब दो मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चा बी.डी. भालेकर मैदान येथून सुरु झाला त्यानंतर शालीमार चौक मार्गे,सीबीएस येथून नाशिक महापालिकापर्यंत काढण्यात आला.



त्यानंतर नाशिक महापालिका अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देत प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे व मनपा गटनेते गजानन शेलार यांनी तक्रारींचा पाढा वाचला. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले कि, जनतेची दिशाभूल करत अनेक खोटी आश्‍वासने देत भाजप सरकार महाराष्ट्र व नाशिक महापालिकेवर सत्तारूढ झाली. परंतु त्यांचे नवनवीन घोटाळे व कामचुकारपणा लागलीच प्रचलित होण्यास सुरुवात झाली. मी लाभार्थी म्हणून फसव्या जाहिराती प्रसारित केल्या जाऊ लागल्या. यावर जवळपास 3 हजार कोटीचा खर्च केला जात आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना यांची तिजोरी रिकामी राहते मग जाहिरातीसाठी एवढा पैसा का खर्च करतात. राज्यात नवी मुंबई, पिपरी - चिंचवड या महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असताना मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली. त्याच बरोबर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री असताना नाशिक शहरासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराची अवस्था बिकट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.