Breaking News

दखल - निवडणूक गुजरातची, की पाकिस्तानची?

रशिया, अमेरिकासारखी काही राष्ट्रं अन्य देशांच्या निवडणुकीत हस्तक्षेप करतात; परंतु तो ही थेट नसतो. पदड्याआडून अशा हालचाली चालू असतात. रशियानं अमेरिका, फ्रान्समधील निवडणुकीत असा हस्तक्षेप केला होता. त्याबाबत अमेरिकेत सुनावणीही चालू आहे. भारत व पाकिस्तानमध्येही पडद्याआडून अशा हालचाली चालू असतील, नाही असं नाही ; परंतु एखाद्या देशाच्या निवडणुकीत तिथं कोणत्या पक्षाचं सरकार असावं, असं वाटणं वेगळं आणि एखाद्या राज्याच्या निवडणुकीत एखाद्या देशानं लक्ष घालणं वेगळं. पाकिस्तानातील सरकार सध्या तेथील अंतर्गत प्रश्‍नांनीच हैराण झालं आहे. पुढच्या वर्षी तिथं निवडणुका आहेत. भ्रष्टाचार आणि अंतर्गत गटबाजी तसंच आर्थिक स्थितीनं पाकिस्तान अगोदरच अडचणीत आला आहे. अशा वेळी गुजरातसारख्या राज्यांतील निवडणुकीत पाकिस्तान लक्ष घालील, असं संभवतच नाही. त्यात देशात कोणताही पक्ष सत्तेवर असला आणि विरोधात कोणताही पक्ष असला, तरी तो पाकिस्तानची मदत घेणं संभवत नाही. असं असलं, तरी राजकीय पक्षाचे नेते कोणत्याही देशांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करीत असतात.



देशात असलेल्या वेगवेगळ्या देशांच्या राजदूतांच्या भेटी घेत असतात. राहुल गांधी यांनी चीनच्या राजदूतांशी अशीच भेट घेतली होती. त्यावरून वाद उद्भवला होता. काँग्रेसच्या नेत्यांच्या अशा बैठकांचं वेळापत्रक सातत्यानं चुकत आलं  आहे. त्यातही ज्या देशाला पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तानसारखे प्रांत सांभाळता येत नाही, तो देश गुजरातच्या निवडणुकीत काय लक्ष घालणार, असा प्रश्‍न पडतो. शिवाय आता त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ताळतंत्र सोडल्यानं काँगेसही त्यात मागं नाही. भाजपनं एकटयानं देशभक्तीचा मक्ता घेतला असून, इतर पक्ष देशद्रोही आहेत, असं ठसविण्याचा प्रयत्न मोदी यांनी नोटाबंदीनंतर पुन्हा सुरू केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. यावरुन पाकिस्ताननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतानं त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणात आम्हाला आणू नये. भारतानं हे सर्व बंद करुन स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवावी, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. भारताकडून होत असलेले आरोप बेजबाबदार आणि निराधार असल्याचंही पाकिस्ताननं म्हटलं आहे. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप असल्याचा आरोप मोदी यांनी सभेला संबोधित करताना केला होता. मुळात ज्या गुजरात मॉडेलचा आणि विकासाचा मुद्दा घेऊन मोदी देशभर फिरले, त्या विकासाच्या मुद्यावर आता मोदी यांना निवडणूक जिंकता येत नाही, हे स्पष्ट झालं आहे. 

त्यामुळं त्यांनी आता भावनिक मुद्द्यांना हात घालायला सुरुवात केली आहे. मोदी यांनी पाकिस्तानकडून काँग्रेसला होत असलेल्या मदतीचा उल्लेख करताच  मोदींच्या टीकेला पˆत्युत्तर देताना, पाकिस्तानवर कोणाचं प्रेम आहे, ते सगळ्यांना माहीत आहे, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या या वाक्युद्धावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे पˆवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी टि्वट करून भाष्य केलं. आपल्या निवडणुकीच्या राजकारणात पाकिस्तानला आणणं भारतानं थांबवायला हवं. कटकारस्थानांच्या आरोपांऐवजी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक जिंकायला हवी. 

पाकिस्तानला नाक खुपसण्याची संधी मोदी यांनीच उपलब्ध करून दिली. काँगेस नेते अलीकडंच पाकिस्तानच्या नेत्यांना भेटले, याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं, असं मोदींनी गुजरातमधील सभेला संबोधित करताना म्हटलं होतं. मोदींच्या या टीकेला उत्तर देताना, कोणत्या सरकारनं पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांना हवाई दलाच्या पठाणकोट तळावर येण्याची परवानगी दिली, असा सवाल करत काँग्रेसनं पलटवार केला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान वाट वाकडी करून पाकिस्तानला गेले. यावरुन पाकिस्तानवर कोणाचं प्रेम आहे, हे दिसतं, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. उधमपूर (ऑगस्ट 2015) आणि गुरदासपूर (जुलै 2015) या ठिकाणी दहशतवादी हल्ले होऊनही कोण पाकिस्तानला गेलं ? कोणतंही निमंत्रण नसताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नासाठी कोणी पाकिस्तानला भेट दिली, असे जरी काँग्रेसनं उपस्थित केले असले, तरी ते ही चुकीचे आहेत. अर्थात तशी संधी मोदी यांनी उपलब्ध करून दिली. 

मोदी यांना पाकिस्तानशी संबंध सुधारावेत, असं वाटणं गैर नाही. त्यासाठी त्यांनी वाकडी वाट करून पाकिस्तानला भेट दिलेली असू शकते; परंतु इतर पक्षीय नेत्यांनी असे काही केले, की त्यांच्या देशभक्तीबद्दल संशय घ्यायचा आणि आपण केलेल्या कृत्याला मात्र देशप्रेमाचा मुलामा द्यायचा असं केलं, तरी शेवटी ते फार काळ टिकत नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्या देशभक्तीबद्दल संशय घेण्याचा मोदी यांना अधिकार नाही. 

गुजरातशी निगडीत अनेक मुद्दे असताना त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी यांनी काही आरोप केले. समजा, एखादी गोपनीय बैठक झाली असेल, तर तीत गुजरातच्या निवडणुकीविषयी चर्चा झाली असेल, याला काय आधार ? गुजरातच्या जनतेवर मोदी यांचा विश्‍वास नाही का, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. 

पठाणकोट हल्ल्यानंतर आम्हाला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेवर विश्‍वास असून त्यांच्याकडून नक्कीच त्यांच्या मायभूमीतील हल्लेखोरांचा तपास केला जाईल, असे त्या वेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते. भाजपचे अध्यक्ष पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेवर विश्‍वास दाखवत असताना मोदी काँग्रेसला पाकिस्तानबद्दल प्रश्‍न कसे विचारतात ? 

पाकिस्तान लष्कराचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना मुख्यमंत्री करा असं आवाहन केलं होतं, असा दावा पंतप्रधानांनी केला. पाकिस्तानच्या ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर  दुसर्‍याच दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी माझा नीच असा उल्लेख केल्याचा दावा मोदी यांनी केला. 

अय्यर यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती. एका बाजूला पाकिस्तानच्या लष्कराचे माजी अधिकारी गुजरातच्या निवडणुकीत हस्तक्षेप करतात, तर दुसरीकडं अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानमधील काही व्यक्तींची बैठक होते. या घटना पाहता पाकिस्तान गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता; परंतु आता त्यामुळं त्यांच्यावरच टीका व्हायला लागली आहे.