Breaking News

पेट्रोकेमिकल्स रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिकांची संमती महत्त्वपूर्ण

नागपूर : रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील नाणार सागवे परिसरात नाणार पेट्रोकेमिकल्स रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिकांची संमती महत्त्वपूर्ण असून लोकांची मते जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.


सदस्य श्रीमती हुस्नबानो खलिफे यांनी या काळात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देसाई बोलत होते. प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी 70 टक्के संमतीची अट महत्त्वपूर्ण असते. ही अट पाळण्यात येईल. स्थानिकांची, प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींची मते यासाठी जाणून घेतली जातील. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या रिफायनरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीसाठी स्थानिक आमदारांना निमंत्रित करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी यावेळी दिले.