Breaking News

वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी कार्यवाही सुरु - चंद्रशेखर बावनकुळे

वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आणि सुरक्षेचे अत्याधुनिक उपाय करण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य डॉ.अपूर्व हिरे यांनी वीज मंडळाच्या अत्याधुनिकीकरण आणि वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. 

श्री.बावनकुळे म्हणाले, नाशिक येथे इंदिरानगर भागात वीजेच्या खांबावर काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरु झाल्याने समीर वाघ या कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या मृत्यूनंतर धोकादायक वीज वाहिन्या ज्या ठिकाणी आहेत त्या भूमिगत करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच समीर वाघ यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही देण्यात आली असून कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे. 

शेतामध्ये अथवा गावात विद्युत तारेला स्पर्श होऊन जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियास तातडीने चार लाख रुपये देण्यात येतात. जर एखादा व्यक्ती जखमी झाला तर त्याचा वैद्यकीय खर्च वीज मंडळामार्फत केला जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने अत्याधुनिकीकरण करीत असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्री. अमरसिंह पंडीत यांनी भाग घेतला.