Breaking News

'सौभाग्य' योजनेंतर्गत 6 हजार 397 घरांना वीज जोडणी देणार - चंद्रशेखर बावनकुळे


केंद्र शासनाच्या 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना' अर्थात 'सौभाग्य' योजनेंतर्गत राज्यातील वीज न पोहोचलेल्या 111 गावांना वीज पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाकडून 6 हजार 97 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामधून वीज पोहोचली नाही, अशा 6 हजार 397 घरांना वीज जोडणी देण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रकाश गजभिये यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की, वीज न पोहोचलेल्या या गावांपैकी बहुतांश गावांना महावितरणतर्फे वीज पोहोचवण्यात येईल; तर दुर्गम भागातील पाडे, वाड्या- वस्त्यांवरील कुटुंबांना महाऊर्जामार्फत प्रत्येकी 65 हजार रुपयांच्या संयंत्राच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून दिली जाईल.

यापूर्वी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी आयात कोळशाचा उपयोग केला जात असे. आता मात्र देशातील कंपन्यांकडून कोळसा घेतला जातो. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे कोळसा कंपन्यांमधून आवश्यक तेवढा कोळसा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे वीज निर्मितीवर मर्यादा आल्या होत्या. त्यावेळी दोन हजार मेगावॅट वीज विकत घ्यावी लागली. औष्णिक ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी जुने वीज निर्मिती संयंत्र बदलून त्याऐवजी आता नवीन सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानाचे वीजनिर्मिती संच बसविण्यात येणार आहेत. 

राज्यात शेतीपंपाच्या नवीन वीज कनेक्शनसाठी 2 लाख 18 हजार अर्ज आले असून त्यापैकी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात एक लाख 18 हजार कनेक्शन देण्यात येणार आहेत. सध्या शंभर शेतकऱ्यांमागे एक ट्रान्सफॉर्मर दिला जातो. मात्र आता या नवीन एक लाख 18 हजार कनेक्शनसाठी प्रत्येकी एक ट्रान्सफॉर्मर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाने व सुरळीतपणे वीज उपलब्ध होणार आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.