Breaking News

आंबा बागेला आग लागुन 50 लाखाचे नुकसान

सिंधुदुर्ग, दि. 30, डिसेंबर - वेंगुर्ला तालुक्यात केळुस-सडा इथल्या प्रशांत कुंदनलाल चावला यांच्या 50 एकर क्षेत्रातल्या आंबा कलम बागेला आग लागून सुमारे 50 लाखाचे नुकसान झाल आहे. आठ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या 2 हजार 200 हापूस आंबा कलमांपैकी 750 कलम या आगीत खाक झाली.


केळुस इथल्या या आगीचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामस्थ तसेच आकाश फिश मिलच्या 80 कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन दल आणि पोलीस स्टेशनला कल्पना देण्यात आली. या आगीची माहिती सडा इथल्या आकाश फिश मिलला समजताच आकाश मिलच्या व्यवस्थापनाने आपल्या पाणी टँकरसह 80 कामगारांना आग विझविण्यासाठी घटनास्थळी पाठविले. तब्बल 12 टँकरद्वारे आग विझविण्याचे काम सुरू होते. केळुस ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आलि. मात्र, डोंगर उतार भागातील आग विझली नसल्याचे लक्षात येताच या अग्नीशमन बंबाला पुन्हा पाचारण करण्यात आले. सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.