चारचाकी झाडावर आदळल्याने 1 ठार
बीड : अंबाजोगाई शहाराजवळील एका झाडावर चारचाकी आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांचा समावेश आहे. रामेश्वर व्यंकटराव मुंडे हे अन्य 4 जणांसोबत फोर्ड इंडेवर गाडीतून (एमएच 12 एनव्ही 1212) अंबासाखर कडून अंबाजोगाईच्या दिशेने येत होते.
गाडी तिरंगा हॉटेल समोरील वळणावर आली असता, गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात गाडीतील धनराज कचरू बिडगर (वय 34, रा. दाऊतपूर) यांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.तसेच रामेश्वर मुंडे यांना गंभीर मार लागला असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे.
