नितीन आगेच्या मारेकर्यांच्या निर्दोषत्वाने मराठा क्रांती मोर्चाची जबाबदारी वाढली.
नितीन आगेच्या मारेकर्यांना फासावर लटकविण्याची जबाबदारी क्रांती मोर्चाने स्वीकारावी!
नाशिक : कुमार कडलग - जामखेड तालुक्यातील खर्डा गावचा तरूण नितीन आगे याचे मारेकरी निर्दोष सुटल्यानंतर तपास यंत्रणेसह न्यायव्यवस्था संशयाच्या सावटाखाली आली असतांना सामाजिक अस्वस्थताही नानाविध प्रश्नांच्या जन्माला कारणीभूत ठरू पहात आहे. या पार्श्वभुमीवर व्यवस्थेने अंतर्मुख होत असतानाच समाज पुरूषांनीही व्यापक भुमिका घेऊन समाजाला संभाव्य दुफळीपासून दुर नेण्यासाठी सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.
29 नोव्हेंबर रोजी कोपर्डी प्रकरणाच्या निकालाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चावरही खर्डा प्रकरणामुळे जबाबदारी वाढली आहे. कायद्यासमोर सर्व समान हा घटनेचा गाभा आणि नैसर्गीक न्याय हे न्याय व्यवस्थेचे अधिष्ठान. तथापी कायदा राबविणारे, कायद्याच्या उल्लंघन करणार्या घटनांचा तपास करणारे हात समाजातील धनदांडग्या, सत्ताधीश घटकांच्या सेवेत रूजू असल्याने कायद्यासमोर भेदभाव होतो, या यंत्रणेच्या तपासातून हाती मिळालेले किंबहूना निर्माण केलेले पुरावे न्यायालयासमोर ठेवले जातात, त्या पुरावांच्या आधारे न्याय व्यवस्था अन्यायायाची तीव्रता तपासून निर्णय देत असते, याचाच अर्थ तपासाचे बीज खानदानी असेल तर न्यायाचे अपत्यही तितकेच गोंडस निपजते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
तपासाचे बीज भेसळ असेल बनावट असेल तर न्यायदानाच्या प्रक्रीयेवर गंभीर परिणाम होतो. हे अलिकडच्या काळात अनेकदा सिध्द झाले आहे. जामखेडचे नितीन आगे खुन प्रकरणही अशाच तपास यंत्रणेच्या बनावट बियाण्याला बळी पडल्याचे प्रथम दर्शनी दिसते. या भेसळ बियाण्यांच्या पिलावळीला नागवे करून नितीनच्या मारेकर्यांना फासावर लटकविण्यासाठी एक नवा संघर्ष मराठा क्रांती मोर्चाने छेडावा आणि बहुजनांमधील थोरपणाची परंपरा पुन्हा पुनरूज्जीवित करण्यास हरकत नसावी.
आपले कायदे या दिशेने पावलं टाकणारच नाहीत का? व्यवस्थेच्या सोयीस्कर आणि धन-सत्ता धार्जिण्या भुमिकेमुळे नितीन आगे सारखे होतकरू बळी जातात. मारेकरी मोकाट सुटतात. हा लोकशाहीचा, नैसर्गीक न्यायाचा आणि एकूण स्वातंत्र्याचा खून आहे. दुसर्या बाजूला अशा घटना जेंव्हा घडतात तेंव्हा त्या घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक प्रयत्न होतो.
जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते असा अंदाज वर्तविला जातो. त्यानंतर या दोन्ही प्रकरणांची तुलना होईल. तुलनेला जातीय आधार दिला जाईल, अर्थात ते स्वाभाविक आहे, भावनांना नेहमीच काटे फुटतात.असो! म्हणूनच नितीन आगे प्रकणाच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाला आपले मोठेपण दाखविण्याची आणखी एक संधी प्राप्त झाली आहे.
28 एप्रिल 2014 रोजी खर्डा येथील कान्होबा डोंगर परिसरात नितीन आगे या तरूणाचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. तत्पूर्वी गावातील काही मंडळींनी नितीनला शाळेतून मारहाण करीत वीट भट्टीवर नेले. तेथून लिंबोणीच्या बागेत नेऊन पुन्हा मारहाण केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कान्होबा डोंगराजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. साधारण असा हा घटनाक्रम.
पोलीसांनी आधी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली. तथापी समाज रेटा वाढू लागल्यानंतर दुसर्या दिवशी फिर्यादी राजू आगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खून आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात डोंगराकडे नेऊन नितीनला गळफास देऊन मारल्याची नोंद झाली. ही घटना घडल्यानंतर संशयितांना अटक करून फाशी व्हावी यासाठी समाज दबाव वाढला.
तपासात निष्पन्न होत असल्याप्रमाणे तीन मुख्य आरोपींसह एकूण दहा जणांना अटक केली. तपास पुर्ण करून तीन अल्पवयीन मुलांसह दहा जणांविरूध्द खटला दाखल झाला. कामकाज झाले, वाद, युक्तीवाद, प्रतीवाद, तपासणी, उलट तपासणी, साक्षी पुरावे या सर्व पारंपारिक प्रक्रियेतून या खटल्याचे कामकाज पुढे सरकत असतांना नितीनला शाळेतून मारहाण करून नेत असतांना पाहणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या प्रत्यक्षदर्शी पासून खटल्यातील अन्य साक्षीदार आणि तपासी अंमलदार यांची ठाम भुमिका महत्वाची होती.
नेमकी हीच भुमिका सोयीनुसार बदलली गेली असे म्हणण्यास मारेकर्यांच्या निर्दोषत्वानंतर पुर्ण वाव आहे. ज्या शाळेतून नितीनला मारहाण करून बाहेर काढले ती शाळा महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांतीच्या प्रवासात पहिल्या क्रमांकाची संस्थेची आहे. या संस्थेला पुरोगामीत्वाचा वारसा आहे. म्हणून पहिले महत्वाचे साक्षीदार ठरलेल्या शालेय व्यवस्थापनावर नितीनला न्याय देण्याच्या या प्रक्रियेत मोठी जबाबदारी होती.
तथापी गावपातळीवरील धनदांडग्या राजकारण्यांच्या कुटील दबावाला साक्षीदारांसह तपास यंत्रणाही बळी पडली. आणि शेवटी समोर उपलब्ध झालेल्या साक्षीपुराव्यांच्या आधारे न्याय करावा लागला. हे वास्तव आहे. या वास्तवातून आपली न्याय व्यवस्थेचे अवलंबित्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. नितीन सारख्या अनेकांच्या मारेकर्यांनार जेंव्हा निर्दोष सोडण्याची वेळ न्याय देवतेवर येते तेंव्हा सामान्य, भोळसट मनाला प्रश्न पडतो की खून झाला हे सत्य आहे.
प्रथम माहिती अहवाल म्हणजे एफआयआर, दाखल झालेले आरोप खून झाल्याचे सांगतात, पण प्रक्रियेच्या अंताला निर्दोषत्व सिध्द होते. मग प्रश्न पडतो खून कुणी केला ? कुणी मारले ? हे प्रश्न न्याय व्यवस्था तपास यंत्रणेला का विचारत नाही. किंबहूना फितूर होणार्या साक्षीदारांवर न्याय व्यवस्थेचा धाक का निर्माण केला जात नाही.
आपले कायदे या दिशेने पावलं टाकणारच नाहीत का? व्यवस्थेच्या सोयीस्कर आणि धन-सत्ता धार्जिण्या भुमिकेमुळे नितीन आगे सारखे होतकरू बळी जातात. मारेकरी मोकाट सुटतात. हा लोकशाहीचा, नैसर्गीक न्यायाचा आणि एकूण स्वातंत्र्याचा खून आहे. दुसर्या बाजूला अशा घटना जेंव्हा घडतात तेंव्हा त्या घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक प्रयत्न होतो.
माणूस या पलीकडे जात बलिष्ठ होते. बळी ठरलेला अमुक एका जातीचा, अन्याय करणारे त्या जातीचे असा भेद करून सामाजिक सलोख्याचा खून केला जातो. गुन्हेगाराला जात धर्म नसतो हे केवळ बोंबलण्याची भाषा उरते. प्रत्यक्षात बळी ठरलेल्या दुर्दैवी व्यक्तीच्या संवेदनांपेक्षा राजकारणाचे प्राबल्य निर्माण करण्यात अधिक स्वारस्य दाखविले जाते.
नितीन आगे आणि कोपर्डीची ताई या दोन्ही माणूसकीचा जीवंत मुडदा पाडणार्या दुर्दैवी घटना. शेजारच्याच एका प्रकरणाचा निकाल लागला मारेकरी निर्दोष सुटलेत, दुसरे प्रकरण निकालाच्या प्रतिक्षेत आहे. साधारण दोन चार दिवसात म्हणजे 29 नोव्हेंबरला निकाल अपेक्षित आहे. या प्रकरणात आजवरचा सुनावणीचा प्रवास पाहता संशयित निर्दोष होण्याची सुतराम शक्यता नाही.
जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते असा अंदाज वर्तविला जातो. त्यानंतर या दोन्ही प्रकरणांची तुलना होईल. तुलनेला जातीय आधार दिला जाईल, अर्थात ते स्वाभाविक आहे, भावनांना नेहमीच काटे फुटतात.असो! म्हणूनच नितीन आगे प्रकणाच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाला आपले मोठेपण दाखविण्याची आणखी एक संधी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन सामाजिक न्याय करणे ही मराठा समाजाची परंपरा आहे या परंपरेच्या मार्गावर आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी नियतीने मराठा क्रांती मोर्चाला दिली आहे तिचा वापर करून कोपर्डीच्या ताईप्रमाणेच अखिल बहुजनांनी आगे कुटूंबांच्या पाठीशी खंबीर उभे रहावे आणि मराठा क्रांती मोर्चाने नेतृत्व करून नितीनच्या मारेकर्यांना फासावर टकविण्यासाठी निर्वाणीचा संघर्ष छेडावा. हीच पुरोगामी महाराष्ट्राची हाक आहे.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा