Breaking News

लुटमार करणा-या टोळीकडून अज्ञाताचा खून एका बाल गुन्हेगारासह दोघांना अटक

सांगली, दि. 25, नोव्हेंबर - लुटमारीचा केलेला गुन्हा उघडकीस येईल, या भीतीपोटी सांगली शहरातील तिघांनी एका वाटसरू व्यक्तीचा कदमवाडी- कसबे डिग्रज रस्त्यावरील शेतात कुर्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका बाल गुन्हेगारासह तीनही आरोपींना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्या वाटसरूची ओळख पटविण्यासाठी सांगली शहर पोलिस प्रयत्नशील होते.


अटक केलेल्यात अमृत संभाजी पाटील (वय 21) व नितीन सुभाष जाधव (वय 41, दोघेही रा. समृध्दी कॉलनी, कलानगर, सांगली) या दोघांसह एका बाल गुन्हेगाराचा समावेश आहे. या दोघांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. नूतन पोलिस अधिक्षक सोहेल शर्मा व सांगली शहर पोलिस उपअधिक्षक अमोल वीरकर यांच्या आगमनालाच लुटमारीतून एका वाटसरूचा खून झाल्याची घटना सामोरी आली आहे. त्यामुळे अनिकेत कोथळे घटनेमुळे चर्चेत असलेले सांगली शहर पोलिस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


बुधवारी रात्रीच्या सुमारास कॉलेज कॉर्नर येथून निघालेल्या एका वाटसरूस या तिघांनी अडविले होते. त्यावेळी या तिघांनी त्याला नितीन जाधव याच्या रिक्षा (क्रमांक एमएच 10- डब्ल्यू 641) मध्ये जबरदस्तीने बसवून बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटली होती. 

मात्र या घटनेची हा वाटसरू पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करेल व आपणाला अटक होईल, या भीतीने पुन्हा या तिघांनी त्याला रिक्षात घेतले. या तिघांनी त्या वाटसरूला सांगलीवाडी गावानजीक कदमवाडी- कसबे डिग्रज रस्त्यावरील एका शेतात नेले. त्याठिकाणी कुर्हाडीचे घाव घालून त्या वाटसरूचा खून करून पलायन केले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके करीत आहेत.