संत कबीर, रहिमांच्या दोह्यांचे वित्तीय गुंतवणुकीशी सांगड हा अप्रतिम प्रयत्न- डॉ. नरेंद्र जाधव
महाराष्ट्र परिचय केंद्र आणि बृह्नमहाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने परिचय केंद्र येथे विनायक सप्रे लिखित ‘दोहानॉमिक्स, टाईमलेस लेसन फॉर इनवेस्टर्स फार्म संत कबीर ॲण्ड रहीम’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जाधव बोलत होते. यावेळी लेखक विनायक सप्रे, परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे दिल्ली स्थित निवासी संचालक प्रफुल पाठक यांच्यासह पत्रकार, अर्थतज्ज्ञ, अभ्यागत, परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
‘दोहानॉमिक्स’ हे पुस्तक अत्यंत वाचनिय असून यामध्ये लेखकाने एखाद्याला वित्तिय गुंतवणूक करायची असल्यास कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, यासाठी मार्गदर्शक म्हणून आजच्या काळात संत कबीर आणि रहीम यांच्यासारखे वित्तीय मार्गदर्शक असावे, असे पुस्तकात लेखकाने नमुद केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
लेखकाचा सूक्ष्म अभ्यास या पुस्तकातून दिसून येतो. 3500 दोहे वाचून त्यातील निवडक 40 दोह्यांचे विवेचन या पुस्तकामध्ये केलेले आहे. वित्तीय गुंतवणूक करताना व्यक्तीला आनंद मिळावा, हा उद्देश असावा. यासाठी काय उपाययोजना करावी, हेही या पुस्तकात लेखकाने मांडलेले आहे. पुस्तकाची समीक्षा करत त्यांनी विविध बँकेमध्ये जमा खात्यात किती व्याज दिले जाते, याबाबत सविस्तर दिलेली माहिती ही अधिकच असल्याचेही मतही डॉ. जाधव यांनी नोंदविले.
पुस्तकामध्ये मध्ययुगीन संत आणि पाश्चात्य वित्तीय गुंतवणूकदार यांना समोरासमोर उभे केलेले आहे. गुरू ही संकल्पना वित्तीय गुंतवणूक सल्लागार म्हणून सांगण्यासाठी विविध आठ दोहे वापरलेले आहेत हे विशेष. एखाद्या गुंतवणुकदाराला त्याचे अंतिम ध्येय निश्चित करूनच गुंतवणूक केली पाहिजे. ही गुंतवणूक करताना एकाच ठिकाणी मोठ्या गुंतवणुकीऐवजी छोट्या-छोट्या गुंतवणुका केल्यास त्यात सातत्यासह लांब पल्ल्याचे लाभही होतील, असेही पुस्तकात नमुद असल्याचा उल्लेख डॉ. जाधव यांनी केला.